१०० महाविद्यालय, १२०० विद्यार्थी ‘युवारंग’मध्ये रंगणार नागपूर...
By जितेंद्र ढवळे | Published: March 19, 2024 05:33 PM2024-03-19T17:33:30+5:302024-03-19T17:34:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली.
नागपूर : 'युवारंग' नवीन कलावंत घडविणारा रंगमंच असल्याचे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवास मंगळवारपासून सुरुवात झाली. अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे युवारंगचे उद्घाटन सकाळी पार पडले. यावेळी डॉ. दुधे मार्गदर्शन करीत होते.
उद्घाटन सोहळ्याला विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक, सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांची उपस्थिती होती. डॉ. दुधे म्हणाले, आपल्या समाजातील पारंपरिक लोककला जोपासण्याची गरज आहे. आधुनिकीकरण वाढल्याने आपली लोककला, लोक साहित्य लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. या लोककलांना जिवंत ठेवण्याचे दायित्व तरुण पिढीने घेण्याची गरज आहे. कीर्तन, दंडार, तमाशा, मंडई आदी लोककला पूर्वी गावोगावी दिसून येत होत्या. या लोककलांना लोकाश्रयदेखील मिळत होता. लोककला हाच कलावंतांचा उदरनिर्वाहाचे साधन होते. हेच त्यांचे स्टार्टअप होते. या युवारंगच्या माध्यमातून अनेक लोककला समोर येतील, असे डॉ. दुधे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. मंगेश पाठक यांनी युवारंग महोत्सवात १०० पेक्षा अधिक महाविद्यालयातून १२०० विद्यार्थी सहभागी झाले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन करीत आभार सांस्कृतिक समन्वयक प्रकाश शुक्ला यांनी मानले.
विविध कलागुणांची उधळण
'युवारंग' आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात चार दिवस विद्यार्थ्यांकडून कलागुणांची उधळण केली जाणार आहे. युवा महोत्सवामध्ये सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, समूहगीत स्पर्धा, शास्त्रीय ताल, ताण वाद्य स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वेस्टन सोलो, वेस्टर्न इन्स्ट्रुमेंटल सोलो, पेंटिंग, पोस्टर, क्ले मॉडलिंग, व्यंगचित्र, कोलाज, रांगोळी, स्कीट (लघुनाटिका), माइम (मूकनाट्य), मिमिक्री, शास्त्रीय नृत्य, लावणी, लोकनृत्य आदी विविध स्पर्धांचे सादरीकरण होणार आहे.