नागपूर शहरातील १५ शाळांकडून १०० कोटीवर वसुल करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 09:33 PM2020-12-18T21:33:08+5:302020-12-18T21:34:32+5:30
Bacchu Kadu, media, nagpur news नारायणा विद्यालयम चिंचभुवन या संस्थेवर ७ कोटी ५९ लाख रुपयांची अतिरिक्त शुल्क वसूली शिक्षण विभागाने काढली आहे. पालकांनी केलेल्या तक्रारींमुळे हे शक्य झाले आहे. पालकांकडून अतिरिक्त शिक्षण शुल्क वसुली करणाऱ्या अशा शहरातील १५ शाळा आहेत, त्यांच्याकडून किमान १०० कोटी रुपयांची वसुली निघणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नारायणा विद्यालयम चिंचभुवन या संस्थेवर ७ कोटी ५९ लाख रुपयांची अतिरिक्त शुल्क वसूली शिक्षण विभागाने काढली आहे. पालकांनी केलेल्या तक्रारींमुळे हे शक्य झाले आहे. पालकांकडून अतिरिक्त शिक्षण शुल्क वसुली करणाऱ्या अशा शहरातील १५ शाळा आहेत, त्यांच्याकडून किमान १०० कोटी रुपयांची वसुली निघणार असल्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
शैक्षणिक संस्था आणि पालक यांचा संघर्ष वाढत आहे. यापूर्वी हिंगणघाट, अकोला येथील शिक्षण संस्थेवर गुन्हा दाखल झाले आहे. वर्धा रोडवरील नारायणा विद्यालयम या शाळेचे पालक २०१९ पासून शिक्षण शुल्क वाढीच्या विरोधात संघर्ष करीत होते. शिक्षण संस्थांना कायद्याचे भय नसल्याने पालकांना न्याय मिळत नव्हता. पण यापुढे शिक्षण संस्थांची अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, पालकांसोबत फसवणूक कराल तर सोडणार नाही, असा दम यावेळी त्यांनी दिला. पत्रपरिषदेला नारायणा विद्यालयंम संघर्ष समितीचे सोनाली भांडारकर, प्रशांत वानकर, अभिषेक जैन, अजय चालखुरे, संजय शर्मा आदी उपस्थित होते.
अन्यथा शाळेला कुलूप लावू
शाळेने एक महिन्यात ७ कोटी ५९ लाख रुपयांचे अतिरिक्त शुल्क पालकांना दिले नाही, तर न्यायालयात जाऊ, शाळेला कुलूप लावण्यापर्यंत कारवाई करू, असा दावा बच्चू कडू यांनी केला. राजकारण्यांच्याही शाळा असल्याने कारवाई होवू नये म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणण्यात आला होता. यापुढेची नफेखोरी व पालकांची फसवणूक केल्यास शाळांवर कारवाई सुरूच राहिल.
पालकांनी समोर यावे
शाळांकडून होत असलेल्या फसवणुकीसंदर्भात पालकांनी पुढे न आल्यास, न्यायासाठी लढताना पुरावे देणे अवघड होते. वाठोड्यातील नारायणा ई-टेक्नो शाळेच्या बाबतीत तक्रारी आल्या आहे. पालकांनी कारवाईसाठी मोठ्या संख्येने पुढे यावे. या शाळेवर नक्कीच कारवाई होईल आणि त्यांच्याकडून घेतलेल्या अतिरिक्त शुल्काची परतफेडही होईल, असेही कडू म्हणाले.