दलाल व अधिकाऱ्यांनी हडपला १०० कोटींचा एरिअर्स
By गणेश हुड | Published: June 28, 2024 08:47 PM2024-06-28T20:47:21+5:302024-06-28T20:48:10+5:30
शिक्षण विभागातील बोगस नियुक्त्या : शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत घिरट्या
गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : हयात नसलेले जिल्हा परिषदेचे माजी शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांच्याच नव्हे तर अनेक माजी शिक्षणाधिकाऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून खासगी अनुदानित शाळांवर शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हा आकडा चारशेहून अधिक असून नियुक्ती आदेशाच्या मोबदल्यात संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांकडून त्यांना मिळालेला १० ते १२ वर्षांचा एरिअर्स हा यातील दलाल, शिक्षण विभागातील अधिकारी व संस्था चालकांनी हडपल्याचा आरोप आहे. नुसता एरिअर्सचा आकडा १०० कोटीहून अधिक असल्याची जिल्हा परिषद वर्तुळात चर्चा आहे.
आजवर फक्त सोमेश्वर नैताम यांच्याच बोगस स्वाक्षऱ्या करून मागील तारखांत आदेश देवून शिक्षण विभागात शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्याची चर्चा होती. परंतु तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांची हुबेहुब स्वाक्षरी करणारे बहाद्दर शिक्षण विभागात कार्यरत आहेत. बोगस नियुक्त्यांबाबचे वृत्त प्रकाशित झाल्याने या शिक्षकांच्या जिल्हा परिषदेत घिरट्या सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी झाल्यास नोकरी तर जाईलच पोलीस चौकशीलाही सामोरे जावे लागणार असल्याने आता त्यांना आापली फसवणूक झाल्याची जाणीव झाली आहे. आम्ही अडकलो तर तुम्हालाही सोडणार नाही. असा इशारा दलाल व संबंधित अधिकाऱ्यांना या शिक्षकांनी दिल्याची माहिती आहे.
तपासात नियुक्ती आदेश कधी दिला. संबंधित शाळा संचालकांनी या बाबतचा प्रस्ताव पाठविला होता का? किती वर्षांचा एरिअर्स संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना मिळाला. या बोगस नियुक्ती आदेशाला शालार्थ आयडी कुणी दिला. याचा उलगडा चौकशीतून होणार असल्याची दबक्या आवाजात शिक्षण विभागात चर्चा आहे.
रेकार्ड नष्ट करण्याचे प्रयत्न
बोगस नियुक्ती प्रकरणाचा रेकॉर्ड शिक्षण विभागातून बेपत्ता करण्याच्या दलालाच्या हालचाली सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. तर दुसरीकडे एरिअर्सची ६० ते ७० लाखांची रक्कम देवूनही नोकरी धोक्यात आल्यास शिक्षकच या प्रकरणातील सत्य समोर आणतील. असा इशारा काही शिक्षकांनी खासगीत बोलताना दिला. एका शिक्षकांकडून एरिअर्सचे ६० ते ७० लाख रुपये गृहीत धरल्यास नुसता एरिअर्सचा आकडा शंभर कोटींच्या पुढे जातो. यावरून या घाेटाळयाची व्याप्ती व्यापक असल्याचे दिसते.