१०० कोटींच्या फसवणुकीचे ‘टार्गेट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 01:43 AM2017-09-02T01:43:33+5:302017-09-02T01:43:53+5:30
कमी किमतीवर साखर आणि धान्य उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून देशभरात जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणारा ‘नटवरलाल’ प्रवीण निनावे पुन्हा सक्रिय झाला आहे.
जगदीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कमी किमतीवर साखर आणि धान्य उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवून देशभरात जवळपास ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक करणारा ‘नटवरलाल’ प्रवीण निनावे पुन्हा सक्रिय झाला आहे. चार महिन्यांपूर्वी तुरुंगातून बाहेर येताच त्याने वर्धा रोडवरील राजीव नगरात एक पॉश कार्यालय उघडले आहे. त्याने तीन महिन्यात १०० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे टार्गेट दिले आहे. पोलिसांचा राजाश्रय असल्याने हे टार्गेट पूर्ण होण्याचा त्याला विश्वास आहे.
या नटवरलालच्या विरुद्ध नागपूर शहर व ग्रामीण भागासह जयपूर, जोधपूर, इंदोर, जबलपूर, राजनांदगाव, हैदराबाद, दिल्ली आदी शहरांमध्ये २० पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. प्रत्येक प्रकरणात फसवणुकीची रक्कम ही कोट्यवधींची आहे. या प्रकरणांमध्ये त्याला अटकसुद्धा झाली आहे. नटवरलाल बोगस कंपनी बनवून दुसºया राज्यातील व्यापाºयांना आपल्या जाळ्यात ओढतो. त्यांना साखर कारखाने आणि धान्य उत्पादकांशी करार असल्याचे सांगून बाजारभावापेक्षा कमी किमतीत साखर आणि धान्य उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवतो. कॉर्पोरेट शैलीतील कार्यालय आणि आकर्षक महिला कर्मचाºयांच्या माध्यमातून तो इतरांना प्रभावित करतो. विश्वास बसावा म्हणून तो सुरुवातीला कमी किमतीत साखर व धान्यसुद्धा उपलब्ध करून देतो. व्यापाºयाला विश्वास बसल्यावर तो मोठ्या प्रमाणावर साखर व धान्य उपलब्ध करून देण्यासाठी करार करतो. कंपनीच्या नावाने कायदेशीर करार केल्याने पैशाची देवाणघेवाण चेक किंवा आॅनलाईन होत असल्याने फसविले जाणार नाही, याची व्यापाºयांना खात्री असते. परंतु मोठ्या रकमेचे करार होताच नटवरलालचे खरे रूप समोर येते. यानंतर पीडितांना पोलीस किंवा न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नसतो. अनेक पीडितांनी पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने न्यायालयात दाद मागितली आहे. त्याने तब्बल १०० कोटीची फसवणूक केल्याचे सांगितले जाते.
या नटवरलालला नोव्हेंबर २०१६ मध्ये जोधपूर पोलिसांनी ४.८० कोटी रुपयाच्या फसवणूक प्रकरणात राहुल खाबिया व जैन नावाच्या साथीदारासह अटक केली होती. त्याने जोधपूर येथील आर.के. इंडस्ट्रीजचे मालक गौतम जैन यांच्याशी कमी किमतीत साखर उपलब्ध करून देण्याचा करार केला होता. सुरुवातीला त्याने कमी किमतीत साखर दिली सुद्धा. परंतु ४.८० कोटी रुपयाचा चेक मिळताच त्याने पुरवठा केलाच नाही. नंतर साखरेच्या मोबदल्यात धान्य उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. परंतु धान्य सुद्धा न मिळाल्याने गौतम जैन आपले पैसे परत मागू लागले. तेव्हा या नटवरलालने त्यांना नागपुरात आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर जैन यांच्या तक्रारीवरून जोधपूर पोलिसांनी निनावे विरुद्ध गुन्हा दाखल केला.
जोधपूर पोलिसांनी त्याला धंतोली परिसरातील कार्यालयातून पकडले होते. जोधपूरच्या तुरुंगात काही दिवस घालवल्यानंतर त्याला इंदोरच्या पोलिसांनी अटक केली. चार महिन्यांपूर्वीच तो इंदोरच्या तुरुंगातून सुटला.
सूत्रानुसार तुरुंगातून बाहेर येताच निनावे पुन्ह सक्रिय झाला आहे. त्याचे पूर्वी धंतोली परिसरात कार्यालय होते. आता त्याने वर्धा रोडवरील राजीवनगरात नवीन आलिशान कार्यालय उघडले आहे. नवीन दोन माळ्याच्या या कार्यालयात २५ ते ३० कर्मचारी आहेत.
बहुतांश तरुणी आहेत. त्याने इंटरनेट व दुसºया प्रचार माध्यमांवर आपल्या कंपनीच्या मोठमोठ्या जाहिराती दिल्या आहेत. कमी किमतीत साखर किंवा धान्य खरेदी करण्यास इच्छुक व्यापारी इंटरनेट किंवा फोनवर त्याच्याशी संपर्क साधतात. महिला कर्मचाºयांची चमू अशा व्यापाºयांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे काम करतात.
बंदूकधारी सुरक्षा रक्षक
नटवरलालने आपल्या सुरक्षेसाठी दोन बंदूकधारी सुरक्षा रक्षक ठेवले आहेत. ते नेहमीच त्याच्यासोबत राहतात. या बंदुकधारी सुरक्षा रक्षकासह तीन-चार बाऊंसर सुद्धा राहतात. त्याच्या केबिनमध्ये जाण्यापूर्वी बाऊंसरच्या तपासणीतून पार पडावे लागते. सूत्रानुसार त्याला दोन शहरातील पोलीस शोधत आहे. शहर पोलिसांशी सुद्धा संपर्क करण्यात आला आहे. त्याच्याद्वारे फसविल्या गेलेल्या काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केली आहे. असे गुन्हे रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा कार्यरत आहे. अलीकडे एसआयटी सुद्धा स्थापन झाली आहे. यानंतरही दोन डझनापेक्षा अधिक प्रकरणात सहभागी असलेला एक सराईत गुन्हेगार बंदुकधारी सुरक्षा रक्षकांच्या घेºयात फिरत असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बेनामी संपत्तीचा मालक
नटवरलाल निनावे याने फसवणुकीच्या रकमेतून कुटुंबीय आणि भरवशाच्या व्यक्तींच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे. त्याला १० वर्षांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी जेव्हा अटक केली होती तेव्हा त्याच्याकडे कोट्यवधी रुपये किमतीची वाहने सापडली होती. आजही त्याच्याकडे अनेक लक्झरी वाहनांचा ताफा आहे. ही वाहने दुसºयांच्या नावावर खरेदी करण्यात आलेली आहेत. त्याची पत्नी सुद्धा फसवणुकीच्या या धंद्यात सहभागी असल्याचे सांगितले जाते.