नागपूर मनपाचे १०० कोटी येस बँकेत फसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 10:57 PM2020-03-09T22:57:35+5:302020-03-09T22:58:41+5:30

आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. त्यातच मनपाची १०० कोटींची रक्कम येस बँकेच्या सिव्हिल लाईन्स येथील शाखेत फसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत.

100 crore of Nagpur Municipal Corporation stucked in Yes Bank | नागपूर मनपाचे १०० कोटी येस बँकेत फसले

नागपूर मनपाचे १०० कोटी येस बँकेत फसले

Next
ठळक मुद्देआर्थिक अडचणीत वाढ : स्थायी समिती अध्यक्षांचे माहिती सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आर्थिक स्थिती बिकट असल्याने महापालिकेच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे. त्यातच मनपाची १०० कोटींची रक्कम येस बँकेच्या सिव्हिल लाईन्स येथील शाखेत फसल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. मात्र यासंदर्भात वित्त विभागासह अन्य विभागातील अधिकारी बोलायला तयार नाहीत.
स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी येस बँकेत ९५ कोटी फसल्याची माहिती दिली. यासंदर्भात वित्त विभागातील अधिकाऱ्यांना येस बँकेत असलेल्या रकमेची विस्तृत माहिती सादर करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, झोन १ ते ५ मध्ये दररोज जमा होणारी मालमत्ता कराची रक्कम येस बँकेत जमा केली जात होती. चार दिवसानंतर ती महापालिकेच्या खात्यात वळती केली जात होती. १ मार्चपर्यंत बँकेकडून ही रक्कम वळती केली गेली. परंतु २ ते ५ मार्च या दरम्यानची २.६६ कोटीची रक्कम मनपाचे खाते असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात वळती झाली नाही. ६ मार्चलाही रक्कम जमा न केल्याने ७ मार्चला वसुलीची रक्कम बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महापालिकेने काही वर्षापूर्वी झोनमध्ये संकलीत रक्कम येस बँकेत जमा करून ती चौथ्या दिवशी महापालिकेचे खाते असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्यात वळते करण्याचे काम येस बँकेला दिले होते. जोपर्यंत रिझव्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातले नव्हते तोपर्यंत परिस्थिती सुरळीत होती. जाहिरात विभागाचीही काही रक्कम येस बँकेत अडकल्याची माहिती आहे.
वर्ष २०१६-१७ मध्ये दक्षिण-पश्चिम विधानसभा क्षेत्रासाठी मुख्यमंत्री निधीतून ९६ कोटींचा विशेष निधी जारी करण्यात आला. यासाठी येस बँकेत स्वतंत्र खाते उघडण्यात आले. या शीर्षकातील कामे सुरू न झाल्याने ही रक्कम बँकेतील खात्यात पडून असल्याची माहिती आहे. ही रक्कम वेळीच खर्च झाली असती तर आज मनपा आर्थिक अडचणीत आली नसती.

Web Title: 100 crore of Nagpur Municipal Corporation stucked in Yes Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.