नागपुरात दसऱ्याला १०० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:14 AM2018-10-20T00:14:21+5:302018-10-20T00:16:16+5:30
साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर केले. लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सर्वच बाजारपेठांवर जीएसटीचा काहीही परिणाम झालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तांपैकी ‘दसरा’ एक सण. यंदा दसरा सणात सर्वाधिक उत्साह आॅटोमोबाईल, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स, प्रॉपर्टी या बाजारपेठांमध्ये दिसून आला. अनेकांनी नवीन चारचाकी आणि दुचाकी खरेदीसाठी आगाऊ बुकिंग केलेल्या गाड्या घरी नेल्या. शिवाय सोने खरेदीसाठी सराफा बाजारात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. अनेकांनी फ्लॅटचे बुकिंग याच शुभमुहूर्तावर केले. लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. सर्व बाजारपेठांचा आढावा घेतला असता जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. सर्वच बाजारपेठांवर जीएसटीचा काहीही परिणाम झालेला नाही.
कार, दुचाकीची सर्वाधिक विक्री
विविध कंपन्यांची वर्षभरातील एकूण विक्रीपैकी २५ टक्के वाहनांची विक्री नवरात्रीपासून दिवाळीपर्यंत होते. त्यात मारुती व ह्युंडई कंपनीचा सर्वाधिक वाटा असतो. नागपुरातील चार डीलरच्या माध्यमातून जवळपास ५०० कारची विक्री मारुती सुझुकी शोरूममधून झाली. देशातील १६ कार उत्पादकांचे नागपुरात शोरूम आहेत. दसऱ्याला सर्व कंपन्यांच्या जवळपास दोन हजार कारची विक्री झाल्याची माहिती आहे. याशिवाय दुचाकीमध्ये होंडा, हिरो, टीव्हीएस, यामाहा, बुलेट, महिन्द्र या कंपन्यांच्या शोरूममध्ये ग्राहकांनी दुचाकीचे आगाऊ बुकिंग केले होते. जवळपास ५ हजार दुचाकींची विक्री झाल्याची माहिती आहे. त्यात होंडा आणि हिरो कंपनीचा सर्वाधिक वाटा आहे.
सोन्याच्या दागिन्यांना मागणी
दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने खरेदीची परंपरा आहे. या दिवशी प्रत्येकजण किमान एक ग्रॅम सोने विकत घेतो. सोन्याच्या वाढत्या दरानंतरही सराफा बाजारात गर्दी होती. सर्व शोरूममध्ये एक ग्रॅमपासून सोन्याचे दागिने विक्रीस होते. जास्त वजनाचे दागिने खरेदीसाठी अनेकांनी आधीच आॅर्डर दिली होती. चांदीचे ताट, वाटी, ग्लास आणि भेटवस्तूंना मोठी मागणी होती.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात गर्दी
दसºयाला मोबाईल, एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन, लॅपटॉपला जास्त मागणी होती. बँका आणि खासगी आर्थिक संस्थांच्या शून्य टक्के योजनांमध्ये ग्राहकांची खरेदी सुलभ झाली. उपकरणांच्या विक्रीचा आकडा निश्चित सांगणे कठीण असले तरीही कोट्यवधींची उलाढाल झाली. ब्रॅण्डेड उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल होता.
प्रॉपर्टी बाजारात उत्साह
प्रॉपर्टी बाजार नोटाबंदी, जीएसटी, रेरा आदींमधून बाहेर निघाला आहेत. सध्या प्रॉपर्टीच्या किमती सर्वात कमी असून यापुढे वाढतील, असे क्रेडाई नागपूर मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. बँकांच्या कमी व्याजदराच्या कर्ज योजनांमुळे ग्राहकांना खरेदी सुलभ झाली. पंतप्रधान निवासी योजनेत लोकांना २.६७ लाखांपर्यंत सवलत मिळत आहे.