नागपुरात गुढीपाडव्याला १०० कोटींची उलाढाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 10:41 PM2019-04-06T22:41:56+5:302019-04-06T22:44:28+5:30
साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह होता. ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सर्वच वस्तूंच्या शोरूम पारंपरिक पद्धतीने सजल्या होत्या. ग्राहकांनी सर्व वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. शनिवार सुटीचा दिवस असल्यामुळे सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठांमध्ये ग्राहक कुटुंबीयांसह आले होते. गुढीपाडव्याला सर्व बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड उत्साह होता. ग्राहकांचे स्वागत करण्यासाठी सर्वच वस्तूंच्या शोरूम पारंपरिक पद्धतीने सजल्या होत्या. ग्राहकांनी सर्व वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. शनिवार सुटीचा दिवस असल्यामुळे सोने-चांदी, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठांमध्ये ग्राहक कुटुंबीयांसह आले होते. गुढीपाडव्याला सर्व बाजारपेठांमध्ये जवळपास १०० कोटींची उलाढाल झाल्याची माहिती आहे. मुहूर्तावर खरेदीसाठी अनेकांनी आधीच बुकिंग केलेल्या वस्तू गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घरी नेल्या.
इलेक्ट्रॉनिक्स बाजारात उत्साह
गुढीपाडव्याला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीचे नियोजन करणाऱ्यांनी बाजारात गर्दी केली आणि खरेदी करून ऑफर आणि कॅशबॅकचा फायदा घेतला. नागपुरातील सर्वच शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी होती. सोनी, सॅमसंग, एलजी, गोदरेज, इंटेक्स, ओनिडा, आयएफबी, व्हिडीओकॉन, एचपी, डेल, लेनोवो, डायकीन, पॅनासोनिक या कंपन्याचे एलईडी, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लॅपटॉप, कॅमेरा, हॅण्डीकॅम, स्मार्टफोन, किचन चिमणी, मिक्सर, फूड प्रोसेसर, आयर्न, इंडक्शन, शेगडी, गिझर, राईस कूकर, आटाचक्की यासारखी विविध उत्पादने खरेदी केली. ग्राहकांनी शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेतला. लॅपटॉप आणि मोबाईल खरेदीसाठी युवकांची जास्त गर्दी दिसून आली.
सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
नववर्ष गुढीपाडव्याला सोने खरेदीची परपंरा आहे. महाराष्ट्रीय लोकांचा पहिला सण असल्यामुळे प्रत्येकजण समृद्धीसाठी एक, दोन ग्रॅम सोने वा चांदीच्या वस्तू खरेदी करतो. या दिवशी सोने खरेदी केल्याचे आयुष्यभर लक्षात राहते. त्यामुळे सर्वजण या गुढीपाडव्याची निवड करतात. तसेच सरकारी आणि खासगी कंपन्यांचे पगार झाल्यामुळे लोकांमध्ये खरेदीचा उत्साह होता. शनिवारी सोने खरेदीसाठी नागपुरातील सराफांच्या सर्वच शोरूममध्ये गर्दी होती. नागपुरात जवळपास १५ मोठ्या शोरूम तर तीन हजारांपेक्षा जास्त सराफांची दुकाने आहे. या सर्व दुकानांचा एकत्रित व्यवसाय कोट्यवधींच्या घरात असल्याचे सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे म्हणाले, या दिवशी आमच्या चारही शोरूमला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्राहक सकाळपासूनच कुटुंबीयांसह खरेदीसाठी आले होते. याशिवाय लोकांनी आधीच आॅर्डर दिलेले दागिने घरी नेले. यावेळी कमी वजनातील दागिन्यांना जास्त मागणी होती.
दुचाकी व चारचाकी गाड्यांना मागणी
आधीच बुकिंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या गुढीपाडव्याला घरी नेण्यासाठी ग्राहकांनी विविध शोरुममध्ये गर्दी केली होती. मारुती, ह्युंडई, टाटा, टोयोटा, आॅडी, मर्सिडीज, जनरल मोटर्स, रेनॉल्ट, फोर्ड, अशोक लेलँड या कंपनीच्या प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांवर आकर्षक सूट होती. मुहूर्तावर दुचाकी वाहनांची डिलेव्हरी ग्राहकांना मिळेल, अशी व्यवस्था शोरूमतर्फे करण्यात आली होती. या दिवशी जवळपास ६५० कारची विक्री झाल्याची माहिती आहे. त्यात सर्वाधिक वाटा मारुती सुझुकीचा आहे. याशिवाय होंडा, हिरो, यामाहा, टीव्हीएस, बजाज, महिंद्र या कंपन्यांच्या बाईक व स्कूटर ग्राहकांनी खरेदी केल्या. सर्वच कंपन्यांच्या आर्थिक बचतीचा ग्राहकांनी फायदा घेतला. गुढीपाडव्याला सर्व कंपन्यांच्या जवळपास तीन हजार दुचाकींची विक्री झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात होंडा आणि हिरो कंपनीच्या बाईक व स्कूटरेटची सर्वाधिक विक्री झाली.
नवीन प्रकल्पांचे लॉन्चिंग आणि बुकिंग
गुढीपाडव्याला अनेक बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी नवीन प्रकल्पाचे लॉन्चिंग केले. या दिवशी घर आणि दुकानाचे बुकिंग करणाऱ्यांना आर्थिक सवलत देण्यात आली. अनेकांनी मॉड्युलर किचन तर रोख रकमेची ऑफर दिली होती. याशिवाय मुहूर्तावर अनेकांना बुक केलेल्या फ्लॅट आणि प्लॉटचा ताबा देण्यात आला. या मुहूर्तावर बिल्डर्स आणि डेव्हलपर्सनी विशेष समारंभाचे आयोजन केले. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत २.६७ लाख रुपये बचतीचा फायदा मिळाला. या घरांच्या खरेदीवर १ टक्का जीएसटी असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साह दिसून आला. शनिवारी नागपुरात जळपास ३०० पेक्षा जास्त फ्लॅट आणि प्लॉटचे वितरण करण्यात आल्याचे बिल्डर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.