दूषित भागाचे १०० टक्के निर्जंतुकीकरण होणार शक्य; नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांचे संशोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:13 AM2020-05-11T11:13:49+5:302020-05-11T11:14:16+5:30
पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासाठी उपलब्ध असलेल्या पद्धती १०० टक्के कार्यक्षम नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगगपूर विद्यापीठातील चार प्राध्यापकांनी एकत्रित येऊन संशोधन केले व ‘मल्टिफोकल’ तसेच ‘ड्रोन’ आधारित निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या संकटकाळात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासाठी उपलब्ध असलेल्या पद्धती १०० टक्के कार्यक्षम नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगगपूर विद्यापीठातील चार प्राध्यापकांनी एकत्रित येऊन संशोधन केले व ‘मल्टिफोकल’ तसेच ‘ड्रोन’ आधारित निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध लावण्यात यश मिळविले. या दोन्ही संकल्पना पेटंटसाठी दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चारही प्राध्यापक वेगवेगळ्या विद्याशाखांचे आहेत.
भौतिकशास्त्र विभागातील डॉ.संजय ढोबळे, ‘एलआयटी’मधील रसायन अभियांत्रिकी विभागातील प्रा.भारत भानवसे, फार्मसीमधील डॉ.निशिकांत राऊत व डॉ.दादासाहेब कोकरे यांनी हे संशोधन केले. स्वतंत्र पद्धती वापरुन निर्जंतुकीकरणाच्या दोन किंवा अधिक पद्धतींचे संयोजन १०० टक्के कार्यक्षम आहे हे सिद्ध झाले आहे. १०० टक्के कार्यक्षमता साध्य करण्यासाठी एकाच यंत्रामध्ये दोन किंवा अधिक निर्जंतुकीकरण तंत्र एकत्र करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच अतिनील, रासायनिक आणि उष्णता निर्जंतुकीकरण पद्धतींसह ‘मल्टिफोकल’ निर्जंतुकीकरण यंत्र तयार करण्यात आले आहे. ‘लॉकडाऊन’मुळे या उपकरणांच्या बनावटीसाठी आवश्यक असलेली सामग्री उपलब्ध होऊ शकली नाही आणि म्हणूनच याला ‘पेटंट’साठी दाखल करण्यात आले आहे.
अशी आहे संकल्पना
रसायन आधारित निर्जंतुकीकरणात कमी प्रभावी आणि सहज उपलब्ध रासायनिक जंतुनाशक असतात. तसेच गरम हवेच्या धक्क्याने निर्जंतुकीकरण केले जाते. एका अहवालानुसार हा विषाणू तापमानात ५६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मारला जाऊ शकतो. म्हणूनच, १०० टक्के निर्जंतुकीकरणासाठी सध्याच्या प्रणालीमध्ये तापमानात ६० अंश सेल्सिअससह वायुचा उपयोग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘मल्टिफोकल’ निर्जंतुकीकरणाचा उपयोग अतिनील प्रकाश, रासायनिक जंतुनाशक आणि गरम हवेसह युव्ही लाईट वापरुन केले जाते. ते पृष्ठभागापासून ५ ते १० फूट उंचीपर्यंत चालवले जाते. हे हाताळण्यासाठी सुरक्षित असून रुग्णालये, मॉल, दुकाने, कार्यालयात वापरता येऊ शकते.
‘ड्रोन’मुळे धोका कमी
‘ड्रोन’ आधारित रासायनिक निर्जंतुकीकरण यंत्राचा उपयोग विस्तृत क्षेत्रावर होऊ शकतो. विशेष म्हणजे मानवरहित नियंत्रण शक्य आहे व प्रत्यक्ष कुणाला स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संक्रमित भागांचे निर्जंतुकीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी धोका असतो, अशी माहिती या प्राध्यापकांनी दिली.