कंत्राटी तत्वावर नियुक्त होणार १०० फायरमॅन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:00+5:302021-08-28T04:12:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अग्निशमन विभागात कंत्राटी तत्त्वावर १०० फायरमॅन नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मनपा स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अग्निशमन विभागात कंत्राटी तत्त्वावर १०० फायरमॅन नियुक्त करण्याच्या प्रस्तावाला मनपा स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी प्रदान केली. त्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या विभागाला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या ९ अग्निशमन केंद्रांसाठी २८५ पदे मंजूर आहेत. परंतु यापैकी केवळ माेजकीच पदे भरली गेली आहेत. अशा परिस्थितीत मोठी आपत्ती किंवा आगीची घटना घडल्यास फायरमॅन उपलब्ध करताना मोठी कसरत करावी लागते. अग्निशमन विभागाकडून ५० पदांसाठी २० हजार रुपये मानधनावर फायरमॅन नियुक्तीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. परंतु स्थायी समितीचे अध्यक्ष प्रकाश भोयर आणि इतर सदस्यांनी ५० पदे आणखी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला. सर्वसंमत्तीनंतर १०० पदे कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ जून २०२० रोजी अग्निशमन समितीच्या बैठकीत कंत्राटी पद्धतीने फायरमॅन नियुक्तिचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. माजी सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी विभागात रिक्त पदे भरण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यानंतर कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५० पदांसाठी वार्षिक खर्च १.२० कोटी रुपये निश्चित करण्यात आले होते. परंतु आता १०० पदांवर भरती होणार असल्याने २.४० कोटी रुपये खर्च होईल. यावेळी पार्किंग शुल्क वाढीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.
बॉक्स
- ६७.५ टक्के कमी दरात लागणार एलईडी
मनपात बहुतांश निविदा निर्धारित दरापेक्षा अधिक दरावर भरल्या जात आहेत. परंतु शहरातील स्ट्रीट लाईटमध्ये लागून असलेले जुने सोडियम वेपर लाईट बदलून एलईडी लावण्यासाठी एका कंपनीने निर्धारित दरापेक्षा ६७.५ टक्के कमी दरात काम करण्याची तयारी दर्शविली आहे. मे. ओरिएंट ट्रेड लिंक नागपूर असे या कंपनीचे नाव आहे. त्यामुळे यापूर्वी जे एलईडी लाईट बदलण्यात आले ते अधिक किमतीत तर रिप्लेस झाले नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.