राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती, ‘ओजस’ देणार सीबीएसईला टक्कर ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 10:19 PM2017-12-02T22:19:42+5:302017-12-02T22:31:57+5:30
जि.प आणि महापालिका शाळा म्हटलं की आज सामान्य पालकही नाक मुरडतो! या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर कधी देतील? असे लाखदा विचारलं जातं. पण या शाळा आजही आहे तिथेच आहेत. मात्र नव्या वर्षात या शाळा ग्लोबल भरारी घेणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : जि.प आणि महापालिका शाळा म्हटलं की आज सामान्य पालकही नाक मुरडतो! या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर कधी देतील? असे लाखदा विचारलं जातं. पण या शाळा आजही आहे तिथेच आहेत. मात्र नव्या वर्षात या शाळा ग्लोबल भरारी घेणार आहेत.
महापालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील २० शाळा नागपूर विभागात स्थापन करण्यात येतील.
आंतरराष्ट्रीय शाळानिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात १० ‘ओजस’ शाळा स्थापन करतील. या शाळा यानंतर ९० ‘तेजस’ शाळांची निर्मिती करतील. ओजसच्या निर्मितीला महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळेल. एक ओजस शाळा नऊ ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती करेल.
‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांसाठी महापालिका क्षेत्रातून प्रत्येकी एक व ग्रामीण भागातील किमान दोन शाळा निवडण्यात येतील. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येकी दोन ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांसाठी निवडण्यात येतील. नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतच्या कालावधीत या शाळांची निर्मिती होईल.
काय आहे ओजस आणि तेजस
सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर देण्यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ‘ओजस’ आणि ‘तेजस’ शाळांची निर्मिती केली जाईल. सुरुवातीला राज्यात १० ओजस शाळांची निर्मिती होईल. यानंतर एक ‘ओजस’ शाळा नऊ ‘तेजस’ शाळांची निर्मिती करेल. यासाठी ते स्वत:चे मॉडेल या शाळांपुढे ठेवेल.
या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक कोण असतील. कोणत्या शाळा या प्रकल्पासाठी निवडल्या जाव्यात, यासाठी जिल्हास्तरावर समिती असेल.
या प्रकल्पासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘मला चॅलेंज हवे’ या लिंकवर अर्ज करणाऱ्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात येईल. यानंतर ‘ओजस’ आणि ‘तेजस’साठी शिक्षकांची निवड करण्यात येईल.