शारजाह येथून आलेल्या १०० प्रवाशांचे गृहविलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 10:53 AM2021-12-06T10:53:55+5:302021-12-06T10:57:53+5:30

शारजाहून आलेल्या १०० प्रवाशांची मनपातर्फे आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्व प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरणात पाठविण्यात आले. दरम्यान, या सर्वांवर मनपाच्या आरोग्य विभागाचे लक्ष असणार आहेत.

100 passengers return from sharjah to nagpur send to home isolation | शारजाह येथून आलेल्या १०० प्रवाशांचे गृहविलगीकरण

शारजाह येथून आलेल्या १०० प्रवाशांचे गृहविलगीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देपावणे दोन वर्षानंतर विमानतळावर आले विदेशी विमान

नागपूर : ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या नवीन नियमावलीनुसार तब्बल पावणे दोन वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी शारजाह येथून आलेल्या एअर अरेबियाच्या विमानातील १०० प्रवाशांची मनपातर्फे आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीदरम्यान प्रवाशांची धाकधूक वाढली होती. तीन तासांनंतर चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यांना सात दिवस गृहविलगीकरणात पाठविण्यात आले. यादरम्यान, या सर्वांवर मनपाच्या आरोग्य विभागाचे अधिकारी लक्ष ठेवणार आहेत.

एअर अरेबियाचे जी ९-४१६ शारजाह-नागपूर विमान नागपूर विमानतळावर सकाळी ६.४५ वाजता उतरले. विमानात ९५ प्रवासी, ५ लहान मुले आणि चार कॅबिन क्रूसह एकूण १०५ लोक होते. सर्व प्रवासी चाचणी करून नागपुरात आले होते, पण सहा तासांच्या तपासणीच्या नियमानुसार विमानतळावर सर्व प्रवाशांची आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली. प्रवासी आल्यानंतर प्रारंभी त्यांना कस्टर क्लिअरन्समधून जावे लागले. त्यानंतर प्रत्येकाची खासगी प्रयोगशाळेद्वारे आरटी पीसीआर चाचणी करण्यात आली. अहवाल येईपर्यंत तीन तास त्यांना विमानतळावर थांबावे लागले. त्यानंतर त्यांना घरी जाण्यास परवानगी देण्यात आली.

कोविडच्या ओमायक्रॉन या नवीन विषाणूबाबत पसरलेल्या भीतीच्या वातावरणात आजच्या घटनाक्रमामुळे विमानतळावर तणावाची स्थिती नव्हती. त्यानंतर नागपूर-शारजाह जी ९-४१५ विमानाने सकाळी ७.२५ वाजता ९५ प्रवाशांना घेऊन उड्डाण भरले. रविवारी नागपुरात पोहोचलेल्या विदेशी प्रवाशांना सात दिवस गृहविलगीकरणात राहिल्यानंतर पुन्हा आरटी पीसीआर चाचणी करावी लागणार आहे.

दहा प्रवासी आमदार निवासात

शारजाह विमानात नागपूर व्यतिरिक्त असलेल्या दहा प्रवाशांना विमानतळावर आरटी पीसीआर चाचणीसाठी थांबविण्यात आल्यानंतर ते विचलित झाले. त्यांना संस्थेअंतर्गत विलगीकरणात पाठविण्यात येत असल्याची शंका आली. ते प्रवासी विमानतळावर थांबण्यास इच्छुक नसल्यामुळे त्यांना आमदार निवासात पाठविण्यात आले. मनपाचे आरोग्य अधिकारी संजय चिलकर म्हणाले, या दहा प्रवाशांना चाचणी अहवाल येईपर्यंत आमदार निवासात थांबविण्यात आले. अहवाल आल्यानंतर या दहासह एकूण १०० प्रवाशांना गृहविलगीकरणात पाठविण्यात आले.

केवळ तीन देशांतील प्रवाशांना संस्थेअंतर्गत विलगीकरण

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर दक्षिण अफ्रिका, झिम्बावे आणि बोत्सवाना या देशातील प्रवाशांचे संस्थेअंतर्गत विलगीकरण करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त अन्य देशातील नागरिकांच्या आगमनानंतर तपासणी आणि नियमावलीनुसार संस्थेअंतर्गत अथवा गृहविलगीकरण करण्यात येणार आहे. नागपूर विमानतळावर आरटी पीसीआरची सशुल्क तपासणीची व्यवस्था आहे आणि शुल्क अदा करण्यास सक्षम नसलेल्यांची मनपातर्फे आमदार निवासात चाचणीची व्यवस्था आहे.

मनपा चमू तीन दिवस भेटी देतील

शारजा येथून आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे शहरात दाखल झालेल्या प्रवाशांचा व क्रु मेंबरचा आरटीपीसीआरचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे सर्वांना आता पुढील सात दिवस होम क्वारंटाइन म्हणजे गृहविलगीकरणात राहावे लागणार आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले, या सात दिवसांत मनपाची चमू दुसऱ्या, चौथ्या आणि सातव्या दिवशी संबंधित प्रवाशांच्या घरी भेट देतील. सातव्या दिवशी पुन्हा त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. ज्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येईल त्यांना रुग्णालयात दाखल केले जाईल.

आठ उड्डाणे नवीन तर चार जुन्या वेळेनुसार

एअर अरेबिया नागपूर-शारजाह-नागपूरकरिता या महिन्यात १२ विमानांचे उड्डाणाचे संचालन करणार आहे. यामध्ये आठ विमानांचे आगमन सकाळी ६.४५ वाजता आणि सकाळी ७.२५ वाजता प्रस्थान तर चार विमानांचे आगमन व प्रस्थान आधीच्या वेळेनुसरच होणार आहे.

आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल.

--

आरटी पीसीआर चाचणी

- दहा प्रवाशांची आमदार निवासात आरटी पीसीआर चाचणी

- तीन तासांत चाचणी अहवाल आल्यानंतर प्रवासी विमानतळाबाहेर

- चाचणीदरम्यान सर्वच प्रवाशांची धाकधूक वाढली

- आरटी पीसीआर चाचणीसाठी आमदार निवासात पोहोचलेल्या प्रवाशांना तीन तास थांबावे लागले

- आरटी पीसीआर चाचणीत सर्व प्रवाशांचे अहवाल निगेटिव्ह

Web Title: 100 passengers return from sharjah to nagpur send to home isolation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.