१०० टक्के शिक्षक राहतील उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:29+5:302021-06-19T04:06:29+5:30
(औरंगाबाद डमी ) नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भातील शाळा येत्या २८ जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार शाळेत ...
(औरंगाबाद डमी )
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भातील शाळा येत्या २८ जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालकांच्या निर्देशानुसार शाळेत विद्यार्थी येणार नसले तरी शिक्षकांना मात्र उपस्थित राहावे लागणार आहे. शिक्षकांनीही आम्ही १०० टक्के उपस्थित राहू असा प्रतिसाद दिला आहे.
मार्च २०२० पासून जिल्ह्यात शाळा बंद आहे. डिसेंबर २०२० मध्ये शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न झाले होते. नववी ते बारावीचे वर्ग सुरूही झाले होते. परंतु कोरोनामुळे शाळा बंद कराव्या लागल्या. विदर्भातील नवीन शैक्षणिक सत्राला २८ जूनपासून सुरुवात होणार आहे. यासत्रात शाळेची घंटा वाजणार नाही आणि विद्यार्थीही नसणार आहे. पण शिक्षकांना उपस्थित राहण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यातील ४१११ शाळा सुरू होणार आहे.
- जिल्ह्यातील शाळेचा आढावा
जिल्हा परिषदेचा शाळा - १५३०, एकूण विद्यार्थी ७०००० एकूण शिक्षक ४४००
नगर परिषदेच्या शाळा - ६८, एकूण विद्यार्थी १४८००, एकूण शिक्षक ५२४
महापालिकेच्या शाळा - १५६, एकूण विद्यार्थी १८४३० एकूण शिक्षक १२४९
अनुदानित शाळा - १२०२ एकूण विद्यार्थी ४,३४,४९२, एकूण शिक्षक - १४९७२
विना अनुदानित शाळा - ११५५ एकूण विद्यार्थी ३,३४,९१०, एकूण शिक्षक १३४५०
- जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले पत्र
पहिली ते नववीपर्यंत व अकरावीच्या ५० टक्के शिक्षकाची उपस्थित राहील. दहावी व बारावीच्या १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती राहील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची देखील १०० टक्के उपस्थिती राहील. सर्वच मुख्याध्यापकांना १०० टक्के उपस्थित रहावे लागेल.
- यंदा शासनाकडून शाळा सुरू करण्याचे निर्देश आले नाही. पण शिक्षकांच्या उपस्थितीबाबत निर्देश आले आहे. त्यासंदर्भात शिक्षण विभागाने गटशिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे कळविले आहे. विद्यार्थी उपस्थित राहणार नाही, पण शिक्षकांना उपस्थित रहावे लागणार आहे.
चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी, जि.प.
- शिक्षकांनी कधीच शाळेला विरोध केला नाही. आमच्या हातून विद्यार्थी घडावे हीच आमची भूमिका राहिली आहे. शिक्षकांच्या बाबतीत समाजातील काही घटकांचा गैरसमज आहे. आम्ही शाळेत नक्कीच जाणार आहोत. शासनाच्या निर्देशानुसार पहिल्या दिवशीपासून शिक्षक शाळेत उपस्थित राहतील.
शुद्धोधन सोनटक्के, शिक्षक