सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 01:20 AM2017-09-04T01:20:45+5:302017-09-04T01:21:14+5:30
गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणपती विसर्जनामुळे तलाव मोठ्या प्रमाणात प्रदूषित होतात. तलाव प्रदूषित झाल्याने त्याचा परिणाम तलावातील जीवजंतूवर होतो, मासे मरतात, दुर्गंधी पसरते. तलावातील प्रदूषण काढण्यासाठी मनपाची मोठी यंत्रणा कामाला लागली. या सर्व गोष्टी थांबविण्यासाठी आणि भाविकांच्या श्रद्धेलाही तडा जाऊ न देता ग्रीन अर्थ आॅर्गनायझेशन या संस्थेने सोनेगाव तलावावर कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे आणि तेही कायमची. त्यामुळे सोनेगाव तलाव १०० टक्के प्रदूषणमुक्त होईल, असा दावा संस्थेचे अध्यक्ष आमदार अनिल सोले यांनी केला. आमदार सोले यांच्या मार्गदर्शनात येथे मूर्ती विसर्जनाचे कार्य सुरू आहे.
सोनेगाव तलावात मूर्ती विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याने तलावाच्या सभोवताल टिनाचे कुंपण घालण्यात आले आहे. हा ऐतिहासक तलाव आहे. विसर्जनामुळे हा तलाव प्रदूषित होऊ नये व भाविकांनाही गणपतीचे विसर्जन करताना पारंपरिक पद्धतीने विसर्जन झाले ही भावना व्हावी, या उद्देशाने कृत्रिम तलाव बांधण्यात आला. तलावाच्या काठावर असलेल्या ९० फूट लांब व ३० फूट रुंद आणि १५ फूट खोल असा खड्डा तयार करण्यात आला. या खड्ड्यात तलावातील पाणी साठविण्यात आले. त्याला एका छोट्या तलावाचे रूप देण्यात आले.
विसर्जनासाठी कायमची सोय करण्यात आली. दीड दिवसाच्या गणपतीपासून येथे विसर्जनाला सुरुवात झाली आहे.रविवारपर्यंत येथे किमान ६,००० च्या जवळपास गणपतीचे विसर्जन झाले आहे. असे असतानाही या कृत्रिम तलावात निर्माल्याचा सडा पडलेला दिसत नाही. तलावाच्या बाजूला निर्माल्य क लश ठेवण्यात आले आहेत. संस्थेचे सदस्य निर्माल्य संकलनाचे कार्य करीत आहेत. अडीच फुटापर्यंतच्या गणपती विसर्जनाची सोय येथे करण्यात आली आहे. गणपती विसर्जनानंतर पीओपीच्या मूर्ती काढून मनपाच्या माध्यमातून त्या मूर्तींची व्हिलेवाट लावण्यात येते.
विसर्जनानंतर हा कृत्रिम तलाव बुजवून टाकण्यात येतो. तलावाच्या प्रदूषणाबाबत होत असलेली जनजागृती यामुळे भाविकांचा या कृत्रिम तलावाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या उपक्रमामुळे शहरातील ऐतिहासिक तलावाचे प्रदूषणपासून बचाव झाला असल्याचे सोले म्हणाले.