रेल्वे स्थानकात थंडगार ‘एसी’त १०० रुपयांत मसाजची सुविधा; नागपूर, चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर सुविधा उपलब्ध
By नरेश डोंगरे | Published: June 15, 2024 07:19 PM2024-06-15T19:19:46+5:302024-06-15T19:19:57+5:30
२० जूनपासून प्रारंभ, लवकरच वर्धा, बल्लारशाहमध्येही होणार व्यवस्था
नरेश डोंगरे
नागपूर : प्रवाशांनो... तुम्ही दमला, थकला असाल अन् तुम्हाला ताजेतवाने व्हावेसे वाटत असेल, तर नो टेन्शन. रेल्वे स्थानकावरच तुमच्यासाठी मसाजची सेवा उपलब्ध आहे. १०० रुपये द्या अन् मस्त एसी हॉलमध्ये आरामदायक खुर्चीवर मसाज करून घ्या. होय, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर ही सुविधा २० जूनपासून सुरू केली जाणार आहे. लवकरच ती अन्य रेल्वे स्थानकांवरही सुरू केली जाणार आहे.
नागपूर रेल्वे स्थानक देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, चंद्रपूर रेल्वे स्थानक हे दक्षिणेतील आंध्र, तसेच तेलंगणा राज्यांच्या मार्गांना जोडणारे आहे. त्यामुळे विविध भागांतून येणारे प्रवासी या स्थानकावर उतरून दुसऱ्या ठिकाणच्या (कनेक्टिंग रेल्वे) गाडीची प्रतीक्षा करतात. गाडीला वेळ असल्याने प्रवासाने दमले, थकलेले प्रवासी कंटाळवाण्या स्थितीत घडाळाच्या काट्याकडे वारंवार बघत असतात. गाडीला बराच विलंब असेल, तर वेटिंग हॉलमध्ये त्यांना खूप वेळ काढणे कठीण होते. हा सर्व विचार करून प्रवाशांना आरामदायक स्थितीची आणि ताजेतवाणेपणाची अनुभूती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मसाजची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नागपूर आणि चंद्रपूर रेल्वे स्थानकांवर २० जूनपासून मसाजची सुविधा वेटिंग हॉलमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘मसाज चेअर’ बोलविण्यात आल्या आहेत. १० मिनिटांसाठी या स्वयंचलित मसाज चेअरवर सेवा घेण्यासाठी प्रवाशांना १०० रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.
कंत्राटदाराकडून होईल व्यवस्था
कंत्राटदारांकडून या खुर्चीची आणि मसाज सेवेची व्यवस्था करण्यात येणार असून, तसा करारही मध्य रेल्वे प्रशासनासोबत करण्यात आला आहे. नागपूर आणि चंद्रपूरनंतर वर्धा, बल्लारशाह, तसेच बैतूल स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य काही स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.