शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० उपग्रह अवकाशात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 09:31 PM2021-01-18T21:31:19+5:302021-01-18T21:33:45+5:30

Satellites made by school childrenडॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अवकाश संशोधनासाठी १०० उपग्रहांची निर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात विदर्भातील १६० विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

100 satellites made by school children will be launched into space | शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० उपग्रह अवकाशात सोडणार

शालेय विद्यार्थ्यांनी तयार केलेले १०० उपग्रह अवकाशात सोडणार

Next
ठळक मुद्देडॉ. अब्दुल कलाम फाऊंडेशनचा अभिनव प्रयोग : विदर्भातील १६० विद्यार्थ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशनच्या पुढाकाराने अवकाश संशोधनासाठी १०० उपग्रहांची निर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात विदर्भातील १६० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. विशेष कौतुकास्पद बाब म्हणजे या विद्यार्थ्यांमध्ये गडचिरोली येथील आदिवासी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. मंगळवारी १९ जानेवारी रोजी शहरातील सेंट व्हिन्सेंट पल्लोटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे या विद्यार्थ्यांची कार्यशाळा होणार आहे.

शालेय जीवनातच अंतराळ तंत्रज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करून भविष्यात अवकाश संशोधन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांनी आपले योगदान द्यावे, यासाठी रामेश्वरम् येथील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनद्वारा अभिनव प्रयोग राबविण्यात येत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज-२०२१ स्पर्धा राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी उपग्रह तयार करणार आहेत.

स्पेस रिसर्च पेलोड क्युब्ज चॅलेंज-२०२१ स्पर्धेंतर्गत देशातून एक हजार विद्यार्थी, तर राज्यातून ३७५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यापैकी १६० विद्यार्थी विदर्भातील आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये महापालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा, आदिवासी आश्रम शाळा, धारावी झोपडपट्टीतील विद्यार्थी तसेच दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या कार्यशाळेत विद्यार्थी २५ ते ८० ग्रॅम वजनाचे उपग्रह बनविणार आहेत. देशातून असे शंभर उपग्रह बनवून त्यांचे रामेश्वरम् येथून ७ फेब्रुवारीला प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यासाठी या विद्यार्थ्यांना २ ते ७ जानेवारीदरम्यान ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रकल्पाची नोंद जागतिक, आशियाई तसेच राष्ट्रीय स्तरावरील विक्रमासाठी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    हा प्रकल्प डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन, स्पेस झोन इंडिया तसेच चेन्नई येथील मार्टीन ग्रुप यांच्या सहकार्याने घेण्यात येत आहे, अशी माहिती फाउंडेशनचे सरचिटणीस मिलिंद चौधरी तसेच महाराष्ट्र समितीचे सभासद डॉ. विशाल लिचडे यांनी दिली आहे.

Web Title: 100 satellites made by school children will be launched into space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.