मेंढेपठार येथे १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:09 AM2021-05-26T04:09:36+5:302021-05-26T04:09:36+5:30
काटाेल : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी एकीकडे काेराेना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रशासनाला नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागत आहे तर दुसरीकडे, काटाेल ...
काटाेल : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी एकीकडे काेराेना प्रतिबंधक लस घेण्यासाठी प्रशासनाला नागरिकांमध्ये जनजागृती करावी लागत आहे तर दुसरीकडे, काटाेल तालुक्यातील मेंढेपठार (बाजार) येथे ४५ वर्षांवरील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणारे मेंढेपठार (बाजार) हे काटाेल तालुक्यासोबत नागपूर जिल्ह्यात पहिले गाव ठरले आहे. या लसीकरण माेहिमेत स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
मेंढेपठार (बाजार) येथील ४५ वर्षांवरील ९८ टक्के नागरिकांना काेराेना प्रतिबंधक लसीचा दुसरा डाेस देण्यात आला असून, उर्वरित दाेन टक्के नागरिकांचा दुसरा डाेस १५ दिवसांत पूर्ण केला जाईल, अशी माहिती तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे यांनी दिली. शिवाय, शासनाच्या आदेशानुसार १८ ते ४४ वर्षे वयाेगटातील नागरिकांना लसीकरणासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने जनजागृती व समुपदेशन केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
लस घेतलेली प्रत्येक व्यक्ती सुरक्षित कसा राहील, याची विशेष काळजी घेत उपाययाेजना केल्या जात आहेत. उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर, खंड विकास अधिकारी संजय पाटील, तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. शशांक व्यवहारे व डाॅ. हर्षवर्धन मानेकर यांच्यासह ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, संगणक परिचालक यांची मदत व स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभल्याने हे कार्य यशस्वी झाले, अशी प्रतिक्रिया सरपंच दुर्गा चिखले यांनी व्यक्त केली.