गोसीखुर्दसाठी १ हजार कोटीचा बूस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:08 AM2021-03-09T04:08:29+5:302021-03-09T04:08:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयाची तरतूद करीत राज्य सरकारने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द सिंचन प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयाची तरतूद करीत राज्य सरकारने कित्येक वर्षांपासून अडकून पडलेल्या या प्रकल्पाला बूस्टर डोज दिला आहे. यासोबतच राज्य सरकारने डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्पही केला आहे.
गोसीखुर्द प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित झाल्याने याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. परंतु याच्याशी संबंधित इतर कामे राज्य सरकारला करायची आहेत. सिंचन विभागाचे म्हणणे आहे की, या निधीतून पाणी वापर संस्था मजबूत होतील. त्यांच्यासाठी इमारत तयार होईल. शेतकऱ्यांना कमी वेळात पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होईल. यासोबत शेतकऱ्यांनाही प्रकल्पाचे भागीदार बनवले जाईल, जेणेकरून त्यांना अधिकाधिक लाभ व्हावा. उर्वरित रकमेतून भूमी अधिग्रहणही पूर्ण केले जाईल. विशेष म्हणजे गेल्या वर्षी अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी राज्य सरकारने ५०० काेटींची तरतूद केली होती. तेव्हा १५०० कोटी रुपये कमी असल्याने हा प्रकल्प २०२४ मध्ये पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. या प्रकल्पाचा लाभ भंडारा व नागपूर जिल्ह्यातील ३० लाख शेतकऱ्यांना होणार असून, २.५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.