दुकानासमोर गर्दी वाढवाल तर १० हजार दंड; नागपुरात आयुक्तांचे  आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 12:33 PM2020-11-10T12:33:09+5:302020-11-10T12:34:52+5:30

Nagpur News नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करून  ५ ते १० हजार रुपये दंड, गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले.

10,000 if you increase the crowd in front of the shop; Order of the Commissioner in Nagpur | दुकानासमोर गर्दी वाढवाल तर १० हजार दंड; नागपुरात आयुक्तांचे  आदेश

दुकानासमोर गर्दी वाढवाल तर १० हजार दंड; नागपुरात आयुक्तांचे  आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देगर्दी नियंत्रणासाठी पोलीसमार्केटमधील गर्दीने प्रशासनाचे वाढवले टेन्शन

 लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर  :   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळे प्रशासनाचा ताप वाढला आहे. शासन दिशानिर्देशाचे पालन व्हावे, यासाठी आराखडा तयार करून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.  
नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करून  ५ ते १० हजार रुपये दंड, गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी  मनपा मुख्यालयात  मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

दिवाळी खरेदीसाठी सीताबर्डी,  गांधीबाग,  इतवारी, महाल, गोकुळपेठ, जरीपटका आणि इतर बाजारपेठेत नागरिकांची  होणारी  गर्दी  ही  कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. शहारातील बाजारांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी नागपुरातील काही बाजारपेठांना ‘व्हेईकल फ्री झोन’ करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मनपा, वाहतूक पोलीस गर्दीवर नियंत्रण आणण्यासंदर्भात  समन्वयाने कार्य करणार आहेत. 
 सीताबर्डी शॉप असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच हॉकर्सच्या प्रतिनिधींनासुद्धा सामाजिक अंतर ठेवणे,  मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी नियमांचे पालन  न केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 
बैठकीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) सारंग आवाड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम, महेश मोरोणे, प्रकाश वराडे, संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमणे, बर्डीचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आदी उपस्थित होते.

स्वत:ची काळजी घ्या
मास्क घातल्याशिवाय कुणालाही दुकानात येऊ देऊ नये, कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या, दुकानात क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊ नये, शारीरिक अंतर राखले जाईल याची काळजी घ्या. कोरोनाच्या या संकटात आपणाला नियमांचे पालन करून एकत्रित लढा द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

गर्दी नियंत्रणाची जबाबदारी सहायक आयुक्तांवर 
बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपाच्या  सहायक आयुक्तांवर सोपविली आहे. यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

यांना आहेत कारवाईचे अधिकार 
आदेशाची अंमलबजावणी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधित झोनचे सहायक आयुक्त तथा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

Web Title: 10,000 if you increase the crowd in front of the shop; Order of the Commissioner in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.