विद्यार्थ्यांची कोंडी करणाऱ्या ६० महाविद्यालयांना दणका; समाज कल्याण विभागाची नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 02:47 PM2023-02-24T14:47:28+5:302023-02-24T14:49:41+5:30
शिष्यवृत्तीचे १० हजारांवर अर्ज प्रलंबित
नागपूर : हजारो विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित आहेत. महाविद्यालयाच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याची तयारी समाजकल्याण विभागाने सुरू केली आहे. याअंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या अशा ६० महाविद्यालयांना समाज कल्याण विभागाने नोटीस बजावली आहे.
नागपूर जिल्ह्यात लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग, भटके-विमुक्त वर्गातील पात्र विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती देण्यात येते. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी व महाविद्यालयांकडून अर्ज समाज कल्याण विभागाला येणे आवश्यक आहे. परंतु, एकट्या नागपूर जिल्ह्यातील ६० महाविद्यालयांकडे १० हजारांवर अर्ज प्रलंबित आहेत. वेळेत अर्ज न आल्यास संबंधित विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील. परिणामी विद्यार्थ्यांना आर्थिक भार सहन करावा लागण्याची शक्यता आहे. आता समाज कल्याण विभागाने अशा महाविद्यालयांची यादी तयार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली आहे. यापूर्वी आयुक्त प्रशांत नारनवरे यांनीही अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. तसेच विद्यापीठालाही या महाविद्यालयाविरुद्ध कारवाई करण्यासंदर्भात पत्र लिहिण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती मिळण्यासाठी विभागाचे प्रयत्न आहेत. परंतु, काही महाविद्यालयांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अर्ज प्रलंबित ठेवणाऱ्या महाविद्यालयांना नोटीस बजावण्यात आली. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही पत्र पाठवून आवश्यक कारवाई करण्यास सांगितले आहे. याची माहिती शासनाकडेही पाठविण्यात येईल.
- सुकेशिनी तेलगोटे, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर