एसटीच्या १० हजार बसेसला करणार ‘अँटि मायक्रो बिअल कोटिंग’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:08 AM2021-07-30T04:08:00+5:302021-07-30T04:08:00+5:30
दयानंद पाईकराव नागपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना एसटी महामंडळानेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. ...
दयानंद पाईकराव
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना एसटी महामंडळानेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कंबर कसली आहे. त्यासाठी राज्यातील १० हजार बसेसला ‘अँटि मायक्रो बिअल कोटिंग’ करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांनी बसच्या गेटचे हँडल, सीटच्या पुढील हँडल आणि इतर भागाला हात लावला आणि त्यांच्या हातावर विषाणू असला तरी कुठलाही विषाणू नष्ट करण्याची क्षमता या कोटिंगमध्ये राहणार आहे. यासाठी एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून हे कोटिंग करण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे.
कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रवासी घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे एसटी बसेसच्या प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. कोरोनाच्या दोन्ही लाटेत एसटीच्या बसेस निर्जंतूक करून आगाराबाहेर काढण्यात येत होत्या. परंतु एक बस एकदाच सोडियम हायपोक्लोराईड लिक्विडने निर्जंतूक करण्यात येत होती. बसने एक फेरी पूर्ण केल्यानंतर पुन्हा ती निर्जंतूक करण्यात येत नव्हती. परंतु आता एसटी महामंडळाने त्यावर कायमस्वरुपी तोडगा शोधून काढला आहे. एसटी महामंडळाच्या राज्यातील १० हजार बसेसला स्वच्छ केल्यानंतर ‘अँटि मायक्रो बिअल कोटिंग’ करण्यात येणार आहे. हे कोटिंग प्रवाशांना दिसणार नसून, स्प्रेच्या माध्यमातून हे कोटिंग करण्यात येणार आहे. बसच्या आतील भागात जेथे-जेथे प्रवाशांचे हात लागतात किंवा त्यांचा संपर्क येतो, अशा सर्व भागात हे कोटिंग करण्यात येणार आहे. शिवशाही, एशियाड आणि साध्या बसेसमध्ये हे कोटिंग होणार आहे. कुठलाही विषाणू नष्ट करण्याची क्षमता या कोटिंगमध्ये आहे. एखाद्या प्रवाशाच्या हातावर विषाणू असला आणि त्याने बसच्या आतील भागाला स्पर्श केला तरी त्याच्या हातावरील विषाणू नष्ट होतो. एकदा बस कोटिंग केल्यानंतर दोन महिने या कोटिंगचा प्रभाव राहतो. दोन महिन्यानंतर ती बस पुन्हा कोटिंग करण्यात येईल. सुरुवातीला १० बसेसला कोटिंग करून त्रयस्थ एजन्सीमार्फत नमुने घेऊन कोटिंग निर्दोष असल्याची खात्री पटल्यानंतर १० हजार बसेसला कोटिंग करण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या या उपाययोजनेमुळे तिसरी लाट आली तरी प्रवासी एसटीच्या बसमधून बिनधास्तपणे प्रवास करू शकतील.
.........
९० कोटी रुपये येणार खर्च
‘अँटि मायक्रो बिअल कोटिंग’ करण्यासाठी एका बसला १५०० रुपये खर्च येणार आहे. एकदा केलेली कोटिंग दोन महिने टिकत असल्यामुळे एका बसला वर्षातून सहावेळा ही कोटिंग करावे लागणार आहे. त्यामुळे एका बसला वर्षभरात नऊ हजार रुपयांचे कोटिंग करावी लागणार आहे. राज्यातील १० हजार बसेसला हे कोटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे वर्षभरात एसटी महामंडळाचे ‘अँटि मायक्रो बिअल कोटिंग’साठी ९० कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
...........