१०,०६२ जन्मली कमी वजनाची बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:08 AM2021-03-06T04:08:07+5:302021-03-06T04:08:07+5:30

सुमेध वाघमारे नागपूर : सर्वसाधारण बाळाचे वजन २.५ किलोपेक्षा जास्त असते. परंतु जेव्हा ते दोन किलोंपेक्षा कमी असते, तेव्हा ...

10,062 low birth weight babies | १०,०६२ जन्मली कमी वजनाची बालके

१०,०६२ जन्मली कमी वजनाची बालके

Next

सुमेध वाघमारे

नागपूर : सर्वसाधारण बाळाचे वजन २.५ किलोपेक्षा जास्त असते. परंतु जेव्हा ते दोन किलोंपेक्षा कमी असते, तेव्हा त्याला कमी वजनाचे म्हणजेच ‘लो बर्थ वेट’ किंवा 'एलबीडब्ल्यू' बाळ म्हटले जाते. कमी दिवसांचे व कमी वजनाच्या बालकांमध्ये त्यांच्या अवयवांचा विकास झालेला नसतो. परिणामी, संसर्गाचा धोका वाढतो. त्यामुळे अशा बालकांची विशेष काळजी घ्यावी लागते. एकट्या डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयात मागील अडीच वर्षांत १००६२ कमी वजनाची बालके जन्माला आली. विशेष म्हणजे, अधिक वजन असलेल्या बाळांची संख्याही वाढली आहे.

बालकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य गर्भधारणेच्याही आधीपासून ठरत असते. सुदृढ माता तसेच गर्भधारणेपासून तर बाळाच्या जन्मापर्यंत तिचा आहार व उत्तम मानसिक स्थिती, आल्हाददायी वातावरण हे सुदृढ बालकासाठी महत्त्वाचे ठरते. परंतु वाढलेला ताणतणाव, बदलती जीवनशैली, आहाराकडे झालेले दुर्लक्ष व अनियमित तपासणी आदींमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याची संख्या मागील काही वर्षांपासून स्थिर आहे. डागा रुग्णालयात २०१८-१९ मध्ये ४२२८, २०१९-२० मध्ये ३३५७ तर फेब्रुवारी २०२१ पर्यंत २४७७ कमी वजनाची बालके जन्माला आली.

- जन्मत: कमी वजनाची कारणे

आईच्या पोटात एकापेक्षा जास्त बाळ असतील तर बाळांचे वजन जन्मत: कमी असण्याची शक्यता असते. या शिवाय, गर्भवती मातेचे पोषणाकडे झालेले दुर्लक्ष, बाळाचा जन्म ३७ आठवड्यांपूर्वीच होणे, ‘प्लेसेन्टा प्रिबिया’ किंवा ‘प्रिक्लेम्पसिया’सारख्या गरोदरपणात प्लेसेंटाशी संबंधित समस्या, आईला उच्च रक्तदाबाचा त्रास, गर्भाशयाच्या काही विकृती, गरोदरपणातील औषधे, मद्यपान, धूम्रपानामुळे गर्भाला विस्कळीत होणारा ऑक्सिजनचा पुरवठा, गर्भाची उशिरा वाढ, गरोदरपणात विविध प्रकारचे संक्रमण, आईला मधुमेह आदी प्रकरणांमध्ये बाळ कमी वजनाचे होऊ शकते.

-जंतुसंसर्गाचा धोका अधिक

कमी वजन असल्याने बाळाची प्रतिकारशक्ती कमी असते. यामुळे जंतुसंसर्ग होण्याचा धोका असतो. यात फुप्फुसांचा न्युमोनिया, रक्ताचा जंतुसंसर्ग वा मेंदूचा जंतुसंसर्ग होऊ शकतो. अवयवांच्या अपरिपक्वतेमुळे कावीळचाही धोका असतो. कमी दिवसाचे व कमी वजनाच्या बाळांमुळे फुप्फुस परिपक्व होण्यासाठी लागणारा ‘सरफॅक्टंट’ नावाचा घटक कमी प्रमाणात तयार होतो. त्यामुळे बाळाला श्वास घेण्यासाठी त्रास होतो. परिणामी, फुप्फुसांचा आजार होतो.

-जन्मत: जास्त वजनाची ४८ बालके

असे म्हटल्या जाते की, बाळाचे वजन जितके जास्त असेल तितके बाळ सुदृढ आणि निरोगी असते, परंतु चार किलोपेक्षा जास्त वजनाचे बाळ जन्माला आल्यास ते लठ्ठ समजले जाते. लठ्ठपणामुळे विविध आजार होण्याचा धोका होऊ शकतो. डागा मध्ये २०१८-१९ मध्ये १५, २०१९-२० मध्ये २२ तर २०२१ (फेब्रुवारीपर्यंत) १४ असे एकूण जास्त वजनाची ४८ बालके जन्माला आली.

-कमी वजनाचे बाळ जन्माला येण्यामागे आईच कारणीभूत

डागा रुग्णालयात कमी वजनाचे बाळ जन्माला येणाऱ्यांची संख्या वाढलेली नाही. मागील काही वर्षांपासून एकूण प्रसूतीमध्ये साधारण १८ ते १९ टक्के हे प्रमाण कायम आहे. कमी वजनाचे बाळ जन्माला येण्यामागे बहुसंख्य प्रकरणात आईच कारणीभूत असते. आईने वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास व तो अंमलात आणल्यास सुदृढ बाळाला जन्म देणे शक्य आहे.

-डॉ. विनीता जैन

बालरोगतज्ज्ञ, डागा रुग्णालय

Web Title: 10,062 low birth weight babies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.