महाज्योतीच्या १०१ विद्यार्थ्यांचे परसेंटाईल स्कोअर ९० च्या वर; एमएचटी आणि सीईटी परीक्षेत घवघवीत यश
By आनंद डेकाटे | Published: June 14, 2023 03:50 PM2023-06-14T15:50:03+5:302023-06-14T15:51:53+5:30
एमएचटी-सीईटीचा निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकताच घोषित केला
नागपूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रम इत्यादी प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटीचा निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकताच घोषित केला. यात महाज्योतीतर्फे घेण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी प्रशिक्षण योजनेतील १०१ विद्यार्थी ९० टक्क्यावर परसेंटाईल स्कोअर घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. तर इतर विद्यार्थी ८० ते ८५ परसेंटाईल स्कोर घेऊन मोठ्या प्रमाणात उत्तीर्ण झालेली आहेत.
एमबीए,एमसीए, बी.आर्च, कृषी यासह अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी-सीईटी प्रशिक्षण महाज्योती मार्फत मोफत देण्यात येते. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब तसेच इंटरनेट डाटा पुरविला जातो. अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकाचा संच घरपोच दिल्या जातो. तज्ज्ञ प्रशिक्षकांव्दारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाते. प्रशिक्षणातील अडचणी दुर सारून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केल्या जाते.
- यशस्वी विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
‘मी दहावी नंतरच महाज्योतीच्या ऑनलाईन प्रोसेसनी नोंदणी प्रक्रीयेत सहभाग घेतला. प्रशिक्षणासाठी महाज्योती कडून मोफत टॅब, इंटरनेट डाटा देण्यात आला. ऑनलाईन प्रशिक्षण सुरु झाले. शिक्षकांचे उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले. त्यामुळे मला ९९.८९ इतके पर्सेंटाईल स्कोअर मिळू शकले.
- मृणाल नरेंद्र तारगे
'मला महाज्योतीच्या एमएचटी आणि सीईटी परीक्षा प्रशिक्षणा अंतर्गत मोफत टॅब आणि इंटरनेट डाटा पुरवण्यात आला. प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी त्यांच्या विषयाची विस्ताराने मांडणी केली. सगळे डाउट क्लिअर केले. सर्व विषयाची उत्तम तयारी करुन घेतली. कोर्स पलिकडे जाऊन अधिक माहिती दिली.
- श्वेता शामराव सूर्यवंशी
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. महाज्योतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर