नागपूर जिल्ह्यातील १०२२ शिक्षक बदलीस पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 09:55 PM2019-05-17T21:55:05+5:302019-05-17T21:55:49+5:30
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची यादी आज शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात बदलीस पात्र शिक्षकांची संख्या १०२२ आहे. बदलीबाबत आक्षेप असल्यास लेखी पुराव्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत शिक्षकांनी हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची यादी आज शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यात बदलीस पात्र शिक्षकांची संख्या १०२२ आहे. बदलीबाबत आक्षेप असल्यास लेखी पुराव्यांसह जिल्हा परिषद शिक्षण विभाग कार्यालयात २२ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत शिक्षकांनी हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
शासन निर्णय व शासन शुद्धीपत्रकान्वये जि.प.प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण निश्चित केलेले आहे. बदलीस पात्र शिक्षकांच्या शाळानिहाय व संवर्गनिहाय वर्ष २०१८-१९ या वर्षासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी जाहीर करण्यात आली होती. प्रारूप याद्यांवर प्राप्त आक्षेपानुसार शिक्षणाधिकारी यांच्यास्तरावर दुरुस्ती करण्यात आली आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप याद्यांवरील दुरुस्तीसाठी केलेल्या अर्जानुसार ज्या शिक्षकांचे समाधान झाले नसेल त्यांनी सक्षम प्राधिकरण यांच्याकडे अपिल अर्ज २२ मेपर्यंत सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे. अपिल अर्जासोबत यापूर्वी दुरुस्ती सुचविलेल्या अर्जाची प्रत, सबळ पुरावे व बदली यादीचे विवरणपत्र लेखी निवेदन व आवश्यक पुराव्यासह आक्षेप २२ मे रोजी ऑनलाइन बदली तक्रार निवारण कक्ष, शिक्षण विभाग जिल्हा परिषद येथे दाखल करावेत. प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडताळणी करून २४ मे रोजी यादी अंतिम करण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत लेखी आक्षेप दाखल न केल्यास नंतरच्या काळात कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नसल्याचे शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी स्पष्ट केले आहे.