छोट्याच विक्रेत्यांवर कारवाई, मोठ्या विक्रेत्यांकडे डोळेझाक, लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 02:57 PM2023-09-13T14:57:07+5:302023-09-13T14:59:57+5:30
महापालिकेच्या पथकाकडून १०३ पीओपीच्या मूर्ती जप्त
नागपूर : पीओपीच्या मूर्ती विरोधात महापालिकेने दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे. सोमवारी पीओपी मूर्तीच्या गोदामावर कारवाई केल्यानंतर मंगळवारी महापालिकेच्या पथकाने चितार ओळ, टेलिफोन एक्स्चेंज चौक, भावसार चौकातील मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईत १०३ पीओपी मूर्ती जप्त करण्यात आल्या व विक्रेत्यांकडून १ लाख ४० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत महापालिकेने पोलिसांचेही सहकार्य घेतले.
मंगळवारी टेलिफोन एक्स्चेंज चौक, भावसार चौक, चितार ओळी या भागातील मूर्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १४ ठिकाणी पीओपी मूर्तींची विक्री होत असल्याचे दिसून आले. या सर्व विक्रेत्यांवर कारवाई करत एकूण १०३ मूर्ती जप्त करण्यात आल्या व प्रत्येकी १०,००० रुपये याप्रमाणे एकूण १,४०,००० रुपये दंड वसूल करण्यात आला. कारवाईत स्वच्छता विभागाचे विभागीय अधिकारी रोहिदास राठोड, गांधीबाग झोनचे सुरेश खरे, नवकिसन शेंडे, लोकेश बासलवार, आशीनगर झोनचे रोशन जांभुळकर, उपद्रव शोध पथकाचे संजय खंडारे, गणेशपेठ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेद्र आंभोरे यांच्या चमूने धडक कारवाई केली. यावेळी पारंपरिक मूर्तिकार सुरेश पाठक व चंदन प्रजापती उपस्थित होते.
- यांच्यावर झाली कारवाई
रोशन मूर्ती भांडार टेलिफोन एक्स्चेंज चौक, निधी गणेश मूर्ती आर्ट भावसार चौक, स्वामी मूर्ती भंडार भावसार चौक, अमूल्य आर्ट भावसार चौक , गणेश मूर्ती भंडार भावसार चौक , ज्योती गणेश भंडार भावसार चौक , भावसार मंदिर भावसार चौक , लोणारे मूर्ती भंडार भावसार चौक , शाहु मूर्ती भंडार चितारओळी महाल , सोनू मूर्ती भंडार चितारओळी महाल , पंजाब लोणारे भावसार चौक , स्वामी मूर्ती भंडार भावसार चौक, विनोद गुप्ता भावसार चौक, चहांदे मूर्ती भंडार न्यू पोलिस स्टेशन पाचपावली.
सेवा समिती सभागृह व बोथरा वाड्याकडे जाल
भावसार चौकामध्ये पथकाने लहान विक्रेत्यांवर कारवाई केली पण मोठ्या विक्रेत्यांकडे पथकाने डोळेझाक केली. भावसार चौकात माजी नगरसेवक विद्या कन्हेरे यांच्या नातेवाईकांनी रस्त्यावरच पीओपी मूर्तीची दुकान सजविली आहे. रस्त्याभर पेंडॉल टाकून रस्ता अडविला आहे पण त्यांच्यावर पथकाने कारवाई केली नाही, असे कारवाई केलेल्या विक्रेत्यांचे म्हणणे आहे. गांधीबागेतील सिंधी पंचायतमधील गोदामात पीओपी मूर्तीचा साठा केला आहे. याबाबत गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. लोकप्रतिनिधीचा वरदहस्त असल्याने तिथे कारवाईला मनपाच्या पथकाचे आणि पोलिसांचेही हात कापतात. त्यांच्या गोदामावर धाड मारा, अशी संतप्त भावना कारवाई केलेल्या विक्रेत्यांनी व्यक्त केली.