नागपूर रेल्वे स्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:59 PM2019-03-18T22:59:50+5:302019-03-18T23:00:39+5:30
लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक बी. एस. बघेल, विकास शर्मा, अर्जुन पाटोले हे सोमवारी दुपारी १.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या १२६१६ जीटी एक्स्प्रेसच्या एस ४ कोचमध्ये एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १६२० रुपये किमतीच्या १४ बॉटल्स आढळल्या. दुसऱ्या घटनेत सायंकाळी ५.४० वाजता आरपीएफ जवान विकास शर्मा, शेख शकील, धर्मदेव कुमार, बी. बी. यादव यांना प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एक व्यक्ती बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यास आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक आर. आर. काळे यांच्यासमोर हजर केले. त्याने आपले नाव मधूर राजेंद्र ब्राम्हणे (१८) रा. पठाणपुरा वॉर्ड, चंद्रपूर सांगितले. त्याच्याजवळील बॅगमध्ये दारूच्या २३४० रुपये किमतीच्या ९० बॉटल्स आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, आर. आर. काळे यांनी जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केली.