१०४ योजनेलाच ‘रक्ता’ची गरज; रोज फक्त दोन ते तीन पिशव्यांचाच पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:33 AM2019-05-27T11:33:59+5:302019-05-27T11:34:29+5:30
तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही. विशेष म्हणजे, शहरात रोज साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असताना, २०१७ या वर्षात ५३९, २०१८ मध्ये ४५८ तर २०१९ मार्चपर्यंत केवळ १२८ रक्त पिशव्यांचा पुरवठा झाला आहे. रक्ताचा तुटवडा व अद्ययावत उपकरणांच्या अभावामुळे या योजनेलाच ‘रक्ता’ची गरज असल्याचे चित्र आहे.
महराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना ‘१०४-ब्लड आॅन कॉल’ राज्यात ७ जानेवारी २०१४ सुरू करण्यात आली. गरजू रुग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गरजू व्यक्तीने या क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर पुण्यातील केंद्रावर फोन जातो, तेथून संबंधित व्यक्तीच्या ठिकाणावरील १०४ क्रमांकाशी तो जोडला जातो, किंवा संबंधिताच्या मोबाईलवर फोन येतो. यात ४० किमी किंवा एक तासाच्या अंतरावरील रुग्णालयांना शीतसाखळीतून रक्त उपलब्ध करून दिले जाते. परंतु या क्रमांकाची जनजागृती होऊनही या क्रमाकांकडून रक्ताची फार कमी मागणी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या योजनेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाल्याचे बोलले जात आहे.
प्लाज्मा, प्लेटलेटचा अभाव
डागा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून सुरू असलेल्या या योजनेकडे शासनाचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाले. योजना सुरू होऊन पाच वर्षे झाले असताना रक्तपेढीसाठी आवश्यक असलेले ‘कम्पोनंट सेप्रेटर’ सारखे आवश्यक उपकरण उपलब्ध झाले नाही. यामुळे रुग्णांना केवळ होल ब्लड (संपूर्ण रक्त) दिले जाते. रुग्णांना गरज असलेली प्लाज्मा, प्लेटलेट मिळत नाही. यामुळे योजनेला नव्या संजीवनीची गरज आहे.
रक्ताचा तुटवडाही
सुरुवातीला म्हणजे २०१६ मध्ये ‘१०४-ब्लड आॅन कॉल’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु पुढे या योजनेतून गरजू व्यक्तींना हवे त्या वेळी व हव्या त्या रक्त गटाचा पुरवठ्याला केंद्राकडून प्रतिसाद मिळणे कमी झाले. यातच या रक्तपेढीला डागा रुग्णालयातील रुग्णांना व कामठी रुग्णालयातील ‘ब्लड स्टोरेज’ला रक्त पुरवठा करावा लागतो. यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’साठी फार कमी रक्त पिशव्या उपलब्ध राहत असल्याने याचा फटकाही योजनेला बसत आहे.
स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणारे कमी४‘१०४’ योजनेत स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्या अत्यल्प आहे. शिवाय, मनुष्यबळ नसल्याने बाहेर रक्तदान शिबिर घेणे या रक्तपेढीला अडचणीचे जाते. यामुळे या क्रमांकावर फोन केल्यावर रक्त मिळत नाही, अशी लोकांची ओरड आहे.
रक्त पिशव्यांच्या मागणीत घट
उपराजधानीत रोज हजार रक्त पिशव्यांची गरज पडते. त्यानुसार ‘१०४- ब्लड आॅन कॉल’ला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. परंतु सोर्इंच्या अभावी ही योजना बारगळत असल्याचे चित्र आहे. २०१४ मध्ये ३१३, २०१५ मध्ये ५०५, २०१६ मध्ये ७०९, २०१७ मध्ये ५३९, २०१८ मध्ये ४५८ तर २०१९ मार्चपर्यंत केवळ १२८ रक्त पिशव्यांचा गरजू रुग्णांना पुरवठा झाला आहे.