सकाळचे १०.४५ वाजूनही ओपीडीला डॉक्टरांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 09:28 PM2018-07-23T21:28:17+5:302018-07-23T21:40:05+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८ वाजतापासूनची असताना औषधवैद्यकशास्त्र विभागात १०.४५ वाजूनही एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ज्यांना रुग्ण कौशल्याबाबत ज्ञान नाही ते ‘जेआर १’, ‘जेआर २’ रुग्णसेवा देत असल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय शिक्षण विभागाचे (डीएमईआर) सहायक संचालन डॉ. तात्याराव लहाने यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान समोर आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागाची (ओपीडी) वेळ सकाळी ८ वाजतापासूनची असताना औषधवैद्यकशास्त्र विभागात १०.४५ वाजूनही एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ज्यांना रुग्ण कौशल्याबाबत ज्ञान नाही ते ‘जेआर १’, ‘जेआर २’ रुग्णसेवा देत असल्याची धक्कादायक बाब वैद्यकीय शिक्षण विभागाचे (डीएमईआर) सहायक संचालन डॉ. तात्याराव लहाने यांच्या आकस्मिक भेटीदरम्यान समोर आली. असाच प्रकार मायक्रोबॉयलॉजी विभाग व मध्यवर्ती प्रयोगशाळेत त्यांना आढळून आला. या भेटीनंतर त्यांनी घेतलेल्या ‘कॉलेज कौन्सिल’मध्ये चांगलीच कानउघाडणी केली. पुन्हा असा प्रकार दिसून आल्यास कारवाई होईल, असा इशाराही दिला.
वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यभरातील मेडिकलमधील अद्यावत सोर्इंना घेऊन डॉ. तात्याराव लहाने यांच्या नावाची समिती स्थापन केली. त्यांच्याकडे याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी दिली. याला घेऊन डॉ. लहाने यांनी नागपूरच्या मेडिकलला भेट दिली. परंतु या पहिल्याच भेटीत मेडिकलचे काही विभाग उघडे पडल्याने खळबळ उडाली.
सकाळी ८ वाजताच पोहचले डॉ. लहाने
सकाळी ८ वाजता डॉ. लहाने मेडिकलच्या ओपीडीमध्ये दाखल झाले. सोमवार आठवड्याचा पहिला दिवस असल्याने रुग्णांची गर्दी होती, परंतु औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागात एकही वरिष्ठ डॉक्टर नव्हते. ‘जेआर १’, जेआर २’ रुग्णसेवा देत असल्याचे पाहून त्यांनी याला गंभीरतेने घेतले. इतर भागाची पाहणी करून १०.४५ वाजता पुन्हा ‘मेडिसीन’ विभागात आल्यावर त्यावेळेपर्यंत एकही वरिष्ठ डॉक्टर पोहचले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले. अशीच स्थिती मायक्रोबॉयलॉजी विभागाची होती. केंद्रीय प्रयोगशाळेत एकही मायक्रोबॉयलॉजी तज्ज्ञ उपस्थित नसल्याने डॉ. लहाने यांनी यालाही गंभीरतेने घेतले.
स्त्रीरोग, अस्थिव्यंगरोग, शल्यचिकित्सा विभागाचे केले कौतुक
डॉ. लहाने यांनी मेडिसीन विभागानंतर स्त्रीरोग व प्रसूती विभाग, अस्थिव्यंगरोग विभाग व शल्यचिकित्सा विभागाच्या ‘ओपीडी’ला भेट दिली. येथील रुग्णांची गर्दी आणि वरिष्ठ डॉक्टर स्वत: रुग्ण तपासणी करीत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले.
‘ट्रॉमा’ व ‘सुपर’लाही दिली भेट
मेडिकलमधील ‘ओटी एफ’, बालरोग विभागाचे ‘एनआयसीयू’ ‘पीआयसीयू’ची पाहणी करून ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिली. या दोन्ही अतिदक्षता विभागासह ‘ट्रॉमा’मध्ये व्हेंटिलेटरची गरज ओळखून प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. साधारण ५० व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना डॉ. लहाने म्हणाले. यावेळी त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटललाही भेट दिली.
डॉ. लहाने यांनी टीबी वॉर्डाला भेट दिली. यावेळी परिसरात वाढलेली झुडुपे, कचºयाचे व बांधकाम साहित्याचे ढिगारे पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी अधिष्ठात्यांना तातडीने याची सफाई करण्याचा सूचना दिल्या.
त्याच दिवशी चाचणी, त्याच दिवशी उपचार
डॉ. लहाने यांनी काही रुग्णांशी चर्चा केली. यात त्यांना सोमवारी रुग्णाची चाचणी झाल्यास त्याला अहवाल घेऊन पुढील सोमवारी बोलाविले जात असल्याचे आढळून आले. त्यांनी अधिष्ठात्यांना त्याच दिवशी चाचणी व त्याच दिवशी उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
अध्यापन व रुग्णसेवेला गंभीरतेने घ्या
डॉ. लहाने यांनी मेडिकलच्या पाहणीनंतर कॉलेज कौन्सिल घेतली. यावेळी उपस्थित विभाग प्रमुखांना अध्यापन व रुग्णसेवेला गंभीरतेने घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच काही विभाग विकासाच्या मार्गावर असल्याचे सांगून जे विभाग अजूनही मागे आहेत त्यांनी त्या दृष्टीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले. तसेच वेळेवर उपस्थित न राहण्याचा प्रकार पुढील भेटीत आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.
अहवाल सादर करणार
राज्यातील मेडिकलमधील रुग्णसेवेला घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्या अनुषंगाने सोमवारी मेडिकलची पाहणी केली. याशिवाय, राज्यभरातील १६ मेडिकलमधील बांधकामाला घेऊनही स्थापन केलेल्या समितीचा सचिव म्हणूनही भेट देण्यात आली. या पाहणीचा अहवाल लवकरच सरकारकडे सादर केला जाईल.
डॉ. तात्याराव लहाने
सहायक संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग