विदर्भातील ३८ नगरपंचायतीतील १०५ जागांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 07:00 AM2021-12-08T07:00:00+5:302021-12-08T07:00:13+5:30
Nagpur News राज्य शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या २७ टक्के आरक्षण संपुष्टात आले आहे. त्याचा फटका सद्यस्थितीत चालू निवडणुकीलाही बसला आहे.
नागपूर : राज्य शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या २७ टक्के आरक्षण संपुष्टात आले आहे. त्याचा फटका सद्यस्थितीत चालू निवडणुकीलाही बसला आहे. विदर्भात २१ डिसेंबरला ३८ नगरपंचायतीसह गाेंदिया व भंडारा जिल्हा परिषदेची निवडणूक हाेत आहे. परंतु अध्यादेश रद्द झाल्याने आता तेथील ओबीसी जागांवरील निवडणुकीलाही स्थगिती मिळाली आहे. विदर्भातील ३८ नगरपंचायतीतील एकूण १०५ जागांवरील निवडणूक सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झाल्या. त्यात सर्वाधिक चंद्रपूरमध्ये २०, यवतमाळ जिल्ह्यातील १८ जागांचा समावेश आहे.
विदर्भातील ३८ नगरपंचायतीसह राज्यातील एकूण १०६ नगरपंचायतीचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयाेगाने घाेषित केला. त्यानुसार मंगळवारी (दि. ७) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस हाेता, तर भंडारा आणि गाेंदिया जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा साेमवारची ‘डेडलाइन’ हाेती. परंतु त्याच दिवशी सर्वाेच्च न्यायालयाने अध्यादेशाला स्थगिती दिल्याने ओबीसी उमेदवारांचा हिरमाेड झाला.
अमरावती जिल्ह्यातील भातकुली, तिवसा, भंडारा जिल्ह्यातील माेहाडी, लाखांदूर, लाखनी, चंद्रपूर जिल्ह्यांतील सिंदेवाही, सावली, पाेंभुर्णा, गाेंडपिपरी, काेरपना, जिवती, गडचिराेलीतील काेरची, कुरखेडा, धानाेरा, चामाेर्शी, मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिराेंचा, गाेंदियातील अर्जुनी माेरगाव, सडक अर्जुनी, देवरी, नागपुरातील हिंगणा, कुही, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर, सेलू, कारंजा (घाडगे), आष्टी, यवतमाळमधील कळंब, राळेगाव, बाभूळगाव, महागाव, माेरगाव, झरी जामणी, बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, माेताळा तसेच वाशिम जिल्ह्यातील मानाेरा येथे २१ डिसेंबरला निवडणूक हाेऊ घातली हाेती. तेथील ओबीसी जागांवरील निवडणूक आता स्थगित करण्यात आली आहे. उर्वरित जागांवरील निवडणूक घाेषित कार्यक्रमाप्रमाणेच हाेणार आहे.
जिल्हा निवडणूक हाेणाऱ्या न.पं. (स्थगित जागा)
अमरावती जिल्हा : तिवसा (३), भातकुली (१)
भंडारा जिल्हा : लाखनी (४), मोहाडी (४), लाखांदूर (४)
चंद्रपूर जिल्हा : जिवती (४), सिंदेवाही (३), सावली (३), कोरपना (३), पोंभुर्णा (४) गोंडपिपरी (३)
गडचिरोली जिल्हा : चामोर्शी (४), सिरोंचा (३), कुरखेडा (२), अहेरी (१), धानोरा (१)
गोंदिया जिल्हा : सडक अर्जुनी (३), देवरी (२), अर्जुनी मोरगाव (१)
नागपूर जिल्हा : कुही (४), हिंगणा (४)
वर्धा जिल्हा : आष्टी (४), कारंजा (४), सेलू (४), समुद्रपूर (२).
यवतमाळ जिल्हा : बाभूळगाव (४), महागाव (४), कळंब (४), राळेगाव (३), मारेगाव (३)
बुलडाणा जिल्हा : संग्रामपूर (४), मोताळा (४)
वाशिम जिल्हा : मानोरा (४)
गोंदिया - भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या ६८ जागांची निवडणूक स्थगित
गोंदिया भंडारा जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीत ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून या निवडणुका होणार आहे. त्यामुळे गोंदिया जि.प.च्या १०, तर पंचायत समितीच्या २० तसेच भंडारा जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ ओबीसी प्रवर्गाच्या जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली आहे.