कोचमध्ये पाणी भरणारे १०५ कामगार बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:17 AM2018-12-27T00:17:14+5:302018-12-27T00:19:27+5:30
नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यात पाणी भरून उदरनिर्वाह करीत असलेल्या कामगारांवर अचानक उपासमारीची वेळ आली. कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याने जुन्या १०५ कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी या बाबीचा विरोध करून बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर निदर्शने केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यात पाणी भरून उदरनिर्वाह करीत असलेल्या कामगारांवर अचानक उपासमारीची वेळ आली. कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याने जुन्या १०५ कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी या बाबीचा विरोध करून बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर निदर्शने केली. कामगारांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमोर आपल्या समस्या मांडल्यानंतर त्यांना योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन देण्यात आले.
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज १२५ रेल्वेगाड्यांचे आवागमन होते. यातील अनेक गाड्यांची नागपुरात देखभाल करण्यात येते. कोचमधील पाणी संपल्यामुळे प्रवाशांना प्रवासात बाथरुम, बेसिनमध्ये पाणी मिळावे यासाठी अनेकदा नागपुरात कोचमध्ये पाणी भरण्यात येते. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने हे काम खासगी ठेकेदाराला दिले आहे. वर्षभरापूर्वी १०५ मजुरांना कामावर ठेवले होते. त्यांना १३ हजार ५०० रुपये वेतन देण्यात येत होते. याशिवाय पीएफ आणि ईएसआयसीची सुविधा मिळत होती. सर्व काही सुरळीत सुरु असताना नवे टेंडर काढण्यात आले आणि या कामाचे कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आले. कामगारांच्या मते नव्या ठेकेदाराने त्यांना कमी पैशात काम करण्यास सांगितले. सोबतच पीएफ आणि ईएसआयसीची सुविधाही देण्यात येणार नसल्याचे सांगितले. अटी मंजूर नसल्यास काम सोडण्याची ताकीद त्यांना देण्यात आली. कामगारांना कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकण्यात आले. अशा स्थितीत कामगारांसमोर उपासमारीची वेळ आली. बुधवारी १०५ कामगारांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयासमोर शांतीपूर्ण मार्गाने निदर्शने करून विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसमोर आपली समस्या मांडली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी कामगारांना ठेकेदाराशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले.