विदर्भात दोन महिन्यात सारीचे १,०५४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 09:31 AM2020-05-21T09:31:53+5:302020-05-21T09:32:35+5:30
कोरोना पाठोपाठ ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ आजार चिंता वाढवीत आहे. ११ मार्च ते १७ मे या दरम्यान विदर्भात १,०५४ रुग्णांची नोंद झाली आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोना पाठोपाठ ‘सारी’ म्हणजे ‘सिव्हिअरली अॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’ आजार चिंता वाढवीत आहे. ११ मार्च ते १७ मे या दरम्यान विदर्भात १,०५४ रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, यातील २७ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती कमी असल्याने ‘कोविड-१९’चा धोकाही अधिक असतो. आतापर्यंत ‘सारी’च्या १५ रुग्णांची कोविड पॉझिटिव्ह म्हणून नोंद असून यातील पाच रुग्ण बळी पडले आहेत.
‘सारी’ म्हणजे तीव्र श्वसनाचे विकार असलेला रुग्ण. यात दमा, डांग्या खोकला आणि इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांचा समावेश होतो. ‘सारी’ आणि कोरोना यांची लक्षणे जवळजवळ सारखीच असतात. सारीच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती तुलनेने कमी असते. या रुग्णांना कोरोनाचा धोका अधिक राहतो. हा आजार झाल्यास मृत्यूची शक्यता वाढते. म्हणून प्रशासन या रुग्णांवरही लक्ष ठेवून आहे. प्रत्येक रुग्णाचे नमुने तपासले जात आहेत. विदर्भात रोज सुमारे १५ ते २० रुग्ण सारीचे आढळून येत आहेत. ही संख्या ‘कोविड’ रुग्णांपेक्षा मोठी आहे. विदर्भात आतापर्यंत भंडारा जिल्ह्यात १२९, चंद्रपूर जिल्ह्यात ११६, गडचिरोली जिल्ह्यात ४४, गोंदिया जिल्ह्यात २६, नागपूर ग्रामीणमध्ये १३, नागपूर शहरमध्ये ४९४, वर्धा जिल्ह्यात ९१, अकोला जिल्ह्यात २३, अमरावती जिल्ह्यात ४६, बुलडाणा जिल्ह्यात ११, वाशिम जिल्ह्यात ११ तर यवतमाळ जिल्ह्यात५० रुग्णांची नोंद झाली आहे.
‘कोविड’मुळे ३९, ‘सारी’मुळे २७ मृत्यू
विदर्भात आतापर्यंत ‘कोविड’चे ९०१ रुग्ण तर ‘सारी’चे १,०५४ रुग्ण आढळून आले आहेत. कोविड रुग्णांच्या मृत्यूची संख्या ३९ आहे; मात्र या तुलनेत सारीच्या मृत्यंूची संख्या कमी आहे. आतापर्यंत २७ मृतांची नोंद झाली आहे.
नागपुरात ‘सारी’चे १६ रुग्ण मृत्यू
नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) व खासगी इस्पितळे मिळून आतापर्यंत ‘सारी’च्या ४९४ रुग्णांची नोंद झाली आहे. हे रुग्ण केवळ नागपूरचे नाही तर आजूबाजूची गावे, जिल्'ातील आहेत. यातील १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
‘सारी-कोविड’ नागपुरात तीन तर अमरावतीमध्ये दोन मृत्यू
नागपुरातील रुग्णालयात नोंद झालेल्या ४९४ रुग्णांमधून सात रुग्णांचे नमुने कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. यात नागपुरातील गड्डीगोदाम खलाशी लाईन येथील ६५ वर्षीय, पांढराबोडी येथील ६५ वर्षीय व मोमिनपुरा येथील ५६ वर्षीय महिलेच्या मृत्यूची नोंद झाली. तर अमरावती जिल्'ात दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आहे. अशा एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
‘सारी’चे ९ बालके, एक मृत्यू
नागपूरच्या मेडिकलच्या बालरोग विभागात ‘सारी’च्या नऊ बालकांची नोंद झाली. यात शून्य ते एक वर्षातील एक बालक, एक ते पाच वर्षांची दोन बालके, तर पाच ते १२ वर्षांतील सहा बालके आहेत. यातील सात रुग्ण बरे झाले असून एका रुग्णाच्या नातेवाईकाने स्वत:च्या जबाबदारीने रुग्णालयातून सुटी घेतली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू आहे.