राज्यात यावर्षी १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

By निशांत वानखेडे | Published: April 15, 2024 08:22 PM2024-04-15T20:22:05+5:302024-04-15T20:22:16+5:30

‘एल-निनाे’ संपेल; ‘ला-निना’ आणताेय चांगला मान्सून

106 percent chance of rain in the state this year; Meteorological department forecast | राज्यात यावर्षी १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात यावर्षी १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

नागपूर : एल-निनाेचा प्रभाव ओसरून ‘ला-निना’च्या प्रभावाने देशात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस हाेण्याचा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तविला हाेता. भारतीय हवामान विभागानेही साेमवारी चांगल्या मान्सूनचा अंदाज व्यक्त केला आहे. वेधशाळेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक म्हणजे १०६ टक्के पाऊस हाेण्याची शक्यता आहे. ही शक्यता सर्वाधिक म्हणजे ५५ टक्के अधिक जाणवत आहे.

हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले, देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीत देशात ९६ ते १०४ टक्के श्रेणीत पडणारा पाऊस हा जरी सरासरी इतका मानला जाताे. गेल्यावर्षी एल-निनाेच्या प्रभावाने पाऊस कमी हाेण्याचा अंदाज हाेता; पण ताे सरासरीच्या आसपास झाल्याने समाधान व्यक्त केले गेले. यावर्षी मार्च, एप्रिल व मे या पूर्वमाेसमी काळात एल-निनाे कमकुवत हाेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर ऑगस्ट व सप्टेंबर या मान्सूनच्या उर्वरित दाेन महिन्यात ‘ला-निना’चा उगम हाेण्याची शक्यता आहे. साेबतच भारतीय महासागरात धन ‘भारतीय महासागरीय द्वि-ध्रुविता’ (पॉझिटिव्ह इंडियन ओशन डायपोल) विकसित होण्याची शक्यताही आहे. या दाेन्हीच्या सकारात्मक प्रभावाने यंदा देशात मान्सून १०६ टक्के अधिक ५ टक्के पाऊस अपेक्षित असल्याचे खुळे यांनी सांगितले.

साधारणत: १ जूनला केरळात दाखल हाेणारा मान्सून सरासरी १० जूनला मुंबईत सलामी देताे. त्यामुळे केरळात आगमन झाल्यानंतर मुंबईचा अंदाज बांधता येईल. मात्र हवामान विभागानुसार नेहमीपेक्षा यंदा मान्सूनचे आगमन लवकर हाेण्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. महाराष्ट्रात ताे १०६ टक्के हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र त्याचे वितरण कसे हाेईल, ताे लाभदायक ठरेल की नुकसानकारक, याचे उत्तर येणारा काळच देईल, असे मत खुळे यांनी व्यक्त केले.

Web Title: 106 percent chance of rain in the state this year; Meteorological department forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस