मनपाच्या १०७३९ विद्यार्थ्यांना मिळणार शिवलेला गणवेश
By मंगेश व्यवहारे | Published: June 6, 2024 07:11 PM2024-06-06T19:11:29+5:302024-06-06T19:11:53+5:30
राज्यस्तरावर झाले टेंडर : महिला आर्थिक विकास महामंडळ शिवणार गणवेश
नागपूर : नागपूरसह विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची पुस्तके पोहचली आहेत. गेल्यावर्षी गणवेशाचा निधी विद्यार्थ्यांना मिळाला होता. परंतु यंदा शिवलेला गणवेश मिळणार आहे. नागपूर महापालिकेचे वर्ग १ ते ८ चे १०७३९ विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरले आहे.
राज्यस्तरावर गणवेशाचे टेंडर झाले आहे. गणवेशासाठीचा कापडाचे टेंडर मे. पदमचंद जैन यांना मिळाले असून, शिवण्याचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला मिळालेले असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यंदा एक नियमित गणवेश आणि एक स्काऊटचा गणवेश विद्यार्थ्यांना मिळणार आहे. सुत्रांच्या माहितीनुसार १ जुलैला शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळतील, अशी अपेक्षा आहे.
५,१०,६२७ पुस्तके पोहचले युआरसी केंद्रावर
महापालिकेच्या हद्दीतील महापालिकेच्या व अनुदानित शाळा अशा एकुण ७३० शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकेही मिळणार आहे. बालभारतीकडून ५,१०,६२७ पुस्तकांचा पुरवठा झालेला असून, ही पुस्तके शहरातील पाचही युआरसी केंद्रावर पोहचले आहे. पुस्तकांची छटाई सुरू असून, लवकरच शाळेतही पोहचणार आहे.