‘१०८’ रिडायलला घेऊन चौकशी
By admin | Published: June 28, 2017 02:55 AM2017-06-28T02:55:59+5:302017-06-28T02:55:59+5:30
गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असली तरी
आरोग्य संचालकांनी घेतली दखल : ‘आॅपरेटर्स’ना दिल्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असली तरी पहिल्या प्रयत्नात हा क्रमांक लागत नाही. वारंवार ‘रिडायल’ केल्यावरच लागतो. यात बराच वेळ जातो. यामुळे ऐनवेळी दुसरा पर्याय निवडावा लागतो. याचे वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात मांडताच राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.
अपघातातील जखमी, हृदयविकाराच्या झटका आलेल्या किंवा गंभीर रुग्णांना जागेवरच प्राथमिक वैद्यकीय सेवा देत शासकीय रुग्णालयात पोहचविण्यासाठी शहरात १०८ क्रमांकाच्या २२ रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते. यातील सहा ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ तर १६ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका आहेत. परंतु ‘१०८’ हा ‘टोल फ्री’ क्रमांकच पहिल्या प्रयत्नात लागतच नाही. पलीकडून ‘पुन्हा प्रयत्न करा’ असे उत्तर मिळते. वारंवार ‘रिडायल’ करण्याची वेळ येते. यात बराच वेळ जातो. नंबर लागला तर हा ‘कॉल’ सुरुवातीला ‘पुणे’ येथे जातो. तेथील ‘आॅपरेटरला’ नागपूरची माहिती नसल्याने त्याला पत्ता समजवण्यात वेळ जातो. त्या आॅपरेटरला पत्ता समजल्यावरच नागपूरच्या संबंधित रुग्णवाहिकेच्या डॉक्टरशी नंबर जुळवून देतो. या डॉक्टरलाही पत्ता समजावून सांगावा लागतो. या तांत्रिक अडचणीमध्ये आणखी वेळ जातो. रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णाचे नातेवाईक दुसऱ्या वाहनांचा पर्याय शोधतात. यामुळे अनेकवेळा या रुग्णवाहिकेला विनारुग्ण परतावे लागते.
परिणामी, ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ने याचे ‘स्टींग आॅपरेशन’ करून ‘१०८ नंबरला साडेसाती’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताला घेऊन आरोग्य विभागात खळबळ उडाली. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. संबंधित ‘आॅपरेटर्सना’ याबाबत सूचना देऊन सिस्टीम सुधारण्याच्या सूचना दिल्या.
‘१०८ रुग्णवाहिकेसाठी ‘अॅप’
१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी आता मोबाईल ‘अॅप’ तयार करण्यात आले आहे. या अॅपवर केवळ एकच क्लिक केल्यास १० सेकंदात रुग्णवाहिका सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जातो व काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होते. याची मदत घ्यावी, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले.
लवकरच सिस्टीम सुरळीत होईल
पहिल्याच प्रयत्नात ‘१०८’ क्रमांक लागत नाही, या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. चौकशी सुरूही झाली आहे. नेमकी समस्या कुठे आहे, याची माहिती घेतली जाऊन लवकरच ही सिस्टीम सुरळीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. परंतु हा क्रमांक लागताच सहा रिंगच्या आत फोन घेतला जातो. असे न झाल्यास संगणक याची नोंद घेऊन संबंधितावर कारवाई होते.
-डॉ. सतीश पवार
संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग