१०८ वी इंडियन सायन्स कॉँग्रेस; छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र आणि कुराणाची दुर्मीळ प्रत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 08:45 AM2023-01-04T08:45:00+5:302023-01-04T08:45:02+5:30
Nagpur News १०८व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरच भर देण्यात आलेला नाही. तर देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन कशा प्रकारे होत आहे, याचीदेखील माहिती मिळत आहे.
योगेश पांडे
नागपूर : १०८व्या ‘इंडियन सायन्स कॉंग्रेस’मध्ये केवळ विज्ञान व तंत्रज्ञान याच्यावरच भर देण्यात आलेला नाही. तर देशातील प्राचीन हस्तलिखितांचे संवर्धन कशा प्रकारे होत आहे, याचीदेखील माहिती मिळत आहे. तेथील ‘आरएफआरएफ’च्या दालनात छत्रपती शिवरायांचे पहिले पत्र आणि कुराणाची सोन्याच्या शाईने लिहिलेली दुर्मीळ प्रतदेखील ठेवण्यात आली आहे.
‘आरएफआरएफ’ (रिसर्च फॉर रिसर्च फाउंडेशन) ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय शिक्षण मंडळाअंतर्गत कार्य करणारी संस्था असून जगभरातील हजारो हस्तलिखिते, दुर्मीळ नाणी एकत्रित केली आहेत. त्यांतील निवडक गोष्टी प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांशी निगडित अनेक हस्तलिखिते तेथे आहेत. त्यांचे शेवटचे पत्रदेखील प्रदर्शनीत ठेवण्यात आले आहे. याशिवाय त्यांचे मूळ छायाचित्रदेखील आहे. सोबतच ताडपत्रींवर लिहिलेले ग्रंथ, अकराशे वर्षांअगोदरची हस्तलिखिते, अनेक मुघलकालीन दस्तऐवजदेखील उपलब्ध आहेत. ‘आरएफआरएफ’कडे भारतीय इतिहास, धर्म आणि प्राचीन भारतातील विज्ञानाशी निगडित साडेपंधरा हजार हस्तलिखिते आहेत.
या हस्तलिखितांमध्ये नंदीनागरी लिपीत लिहिलेले ग्रंथ असून त्यात नदीमाहात्म्याचाही समावेश आहे. अनेक हस्तलिखिते तर अद्यापही अप्रकाशित आहेत. याशिवाय अगदी प्राचीन काळापासूनची साडेचार हजार नाणीदेखील उपलब्ध आहेत. यात दोन हजार वर्षांअगोदरच्या ठेव्याचादेखील समावेश आहे.
नागपूरचा इतिहासही अप्रकाशित
एका हस्तलिखितामध्ये नागपूरचा जुना इतिहासदेखील आहे. त्याचे भाषांतर करून त्याचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या हस्तलिखितांची शासकीय पातळीवर नोंदणीदेखील झाली असून, त्या माध्यमातून संशोधकांना मंच उपलब्ध करून देण्यात येत आहे.
कुराणच्या चार प्रतींपैकी एक नागपुरात
जतन करण्यात आलेल्या सोन्याच्या शाईने लिहिलेल्या दुर्मीळ कुराणाच्या जगभरात चारच प्रती आहेत. त्यांपैकी एक प्रत नागपुरातील प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. ती पाहण्यासाठी अनेक मुस्लिम देशांचे नेतेदेखील संस्थेकडे पोहोचले होते. सोन्याच्या शाईने हे कुराण १६व्या शतकात लिहिले गेले. जगात कुराणाच्या अशा फक्त चार प्रती आहेत. या कुराणच्या तळटिपा नस्तालिक लिपीत असून नस्तालिक आणि तुसी या दोन लिपी पर्शियन भाषेत वापरल्या जातात. या पवित्र कुराणमध्ये ३८५ पाने असल्याचे बोबडे यांनी सांगितले. पण आकार लहान असूनही यांपैकी कोणत्याही पानावर एकही चूक नाही, अशी माहिती ‘आरएफआरएफ’च्या नॉलेज रिसोर्स सेंटरचे संचालक भुजंग बोबडे यांनी दिली. कुराणची प्रत हैदराबादच्या निजामाच्या दिवाणाच्या कुटुंबाने त्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.