दहावीची परीक्षा रद्द, परीक्षा शुल्क कधी परत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:07 AM2021-05-17T04:07:05+5:302021-05-17T04:07:05+5:30
नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क ...
नागपूर : दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी भरलेले परीक्षा शुल्क परत मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ६१४०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले आहे. विद्यार्थ्यांनी भरलेल्या परीक्षेच्या शुल्कापोटी बोर्डाकडे कोट्यवधी रुपये जमा आहे.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गेल्या वर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यावेळी सीबीएससी बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक १०३२ हजारावर शाळा आहे. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यात ६१४०७ विद्यार्थी पास झाले आहेत. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, अशी मागणी काही शिक्षक संघटनांनी केली आहे.
- जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थी संख्या
जिल्ह्यातील दहावीच्या शाळा - १०३२
दहावीतील एकूण विद्यार्थी - ६१४०७
प्रति विद्यार्थी शुल्क - ४१५
एकूण परीक्षा शुल्क - २ कोटी ५४ लाख ८३ हजार ९०५
- परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात कुठलेही निर्देश नाहीत
शासनाच्या निर्णयानुसार दहावीची वार्षिक परीक्षा रद्द झाली आहे. जिल्ह्यात ६१ हजारांवर विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. परीक्षा शुल्क परत करण्यासंदर्भात अद्याप वरिष्ठ स्तरावरून कोणत्याही सूचना नाहीत. वरिष्ठांच्या सूचनेनुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.
- कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. पण मला वाटते परीक्षा व्हायला हव्या होत्या. मी अभ्यास केला आहे. परीक्षा ऑनलाइन किंवा ऑफलाइन घ्यायला हव्या होत्या. आता आम्हाला सरासरी गुण देण्यात येईल. मग अभ्यास करणाऱ्यांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये फरक कसा करणार. परीक्षेचे शुल्क आम्ही भरले आहे. त्यामुळे परीक्षा घ्यायलाच हव्यात.
- श्रुती कोलते, विद्यार्थिनी
- कोरोनामुळे परीक्षा रद्द झाल्याने आम्हा विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आमचा निकाल नववीच्या गुणांचा आधार घेऊन द्यायला हवा. अन्यथा परीक्षा घ्यावी. परीक्षा शुल्क परत करून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय समाधान होणार आहे.
- अंशुल शाहू, विद्यार्थी
- यंदा सर्वच मुले पास होणार आहेत. पण अकरावीच्या प्रवेश मूल्यांकनाच्या आधारे होणे अपेक्षित आहे. कारण सर्वच विद्यार्थ्यांची पातळी सारखी नाही. भरपूर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. त्यांच्या अभ्यासाचे मूल्यांकन झाले पाहिजे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात यावी.
- उल्हास पूरकाम, शिक्षक