दहावी पुरवणी परीक्षेच्या निकालात चार टक्क्यांनी घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 09:44 PM2018-08-29T21:44:51+5:302018-08-29T21:45:27+5:30
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यंदा विभागात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास चार टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात नागपूर विभाग पाचव्या स्थानी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवारी घोषित करण्यात आला. यंदा विभागात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात जवळपास चार टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात नागपूर विभाग पाचव्या स्थानी आहे.
दुपारी १ वाजता मंडळातर्फे ‘आॅनलाईन’ निकाल जाहीर करण्यात आला. नागपूर विभागातून पुरवणी परीक्षेला १३ हजार ३३० परीक्षार्थी सहभागी झाले होते. त्यातील ३ हजार ६१८ अर्थात २७.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी उत्तीर्णांची टक्केवारी ३१.१४ टक्के इतकी होती.
मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुणपत्रिका संबंधित महाविद्यालयांमध्ये आठवड्याभरात पाठविण्यात येतील. ‘आॅनलाईन’ गुणपत्रिकेच्या आधारे विद्यार्थी ३० आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत गुणपडताळणीसाठी अर्ज करू शकतात. तर गुणपत्रिकेच्या प्रतिलिपीसाठी ३० आॅगस्ट ते १८ सप्टेंबरपर्यंत अर्ज केले जाऊ शकतात.
१२ विद्यार्थी झाले ‘डिबार’
पुरवणी परीक्षेदरम्यान मेडिकल चौकातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाऱ्या दोन बोगस विद्यार्थ्यांना पकडण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना ‘डिबार’ करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिली. सोबतच विभागातील इतर जिल्ह्यात कॉपी करताना आढळलेल्या दहा विद्यार्थ्यांनादेखील ‘डिबार’ करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.