समीर जोशीसह ११ जणांवर आरोप निश्चित
By Admin | Published: January 7, 2016 03:27 AM2016-01-07T03:27:10+5:302016-01-07T03:27:10+5:30
एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी...
नागपूर : एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा श्रीसूर्या समूहाचा सर्वेसर्वा समीर जोशी व त्याची पत्नी पल्लवी जोशी यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध बुधवारी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, २०१, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार हित संरक्षण कायदा (एमपीआयडी) यामधील कलम ३ व भारतीय रिझर्व्ह बँक कायद्यातील कलम ४५ (एस), ५८(ब) व ५ (ए) अंतर्गत आरोप निश्चित केले. यापैकी भादंविच्या कलम ४०९ मध्येच जन्मठेपेची तरतूद आहे. या कलमावर जोशीने आक्षेप घेतला होता. न्यायालयाने त्याचे आक्षेप फेटाळून ही कलम कायम ठेवली आहे.
अन्य आरोपींमध्ये श्रीकांत प्रभुणे, निशिकांत मायी, दिलीप डांगे, मोहन पितळे, मुकुंद पितळे, नितीन केसकर, शंतनू कुऱ्हेकर, आनंद जहागीरदार व मनोज तत्वादी यांचा समावेश आहे. सध्या समीर जोशी व मनोज तत्वादी हे दोनच आरोपी कारागृहात असून अन्य आरोपी जामिनावर बाहेर आहेत. १४ सप्टेंबर २०१३ रोजी सोमलवाडा येथील अमित मोरे यांच्या तक्रारीवरून राणा प्रतापनगर पोलिसांनी आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आतापर्यंत १२४४ गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार केली आहे. फसवणुकीची रक्कम १०० कोटीवर गेली आहे. शासनातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. बी. एम. करडे तर, आरोपींतर्फे अॅड. सुभाष घारे, अॅड. आनंद देशपांडे आदींनी कामकाज पाहिले.
केले का नवीन वर्ष साजरे
समीर जोशीने गेल्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री पोलीस शिपायाच्या मदतीने कारागृहाबाहेर निघून नवीन वर्ष साजरे केले असे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले होते. यावरून न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी ‘केले का नवीन वर्ष साजरे’ अशी विचारणा समीर जोशीला केली. त्यावर जोशीने ‘याबाबत मला काहीच माहिती नाही, पोलिसांना विचारा’ असे उत्तर न्यायाधीशांना दिले. आरोप निश्चित करण्यासाठी सर्व आरोपींना न्यायाधीशांसमक्ष उपस्थित करण्यात आले होते. समीर जोशी अगदी समोर उभा होता. तो समोर येताच न्यायाधीशांनी सर्वप्रथम नवीन वर्षाच्या जल्लोषाचा विषय काढला.
एमपीआयडी विशेष न्यायालय :
जन्मठेपेच्या तरतुदीचे कलम कायम
कौस्तुभ मुक्तेला ‘पीसीआर’
श्रीसूर्या गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणात पोलिसांनी कौस्तुभ मुक्ते या आणखी एका एजंटला अटक केली आहे. तो स्वावलंबीनगर येथील रहिवासी आहे. संबंधित न्यायालयाने बुधवारी मुक्तेची ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत (पीसीआर) रवानगी केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुक्तेने गुंतवणूकदारांकडून सुमारे ६६ लाख रुपये जमा करून जोशीला दिले. त्या मोबदल्यात मुक्तेला १८ लाख रुपये कमिशन मिळाले आहे.