जिल्हा परिषदेतील ११ सीडीपीओ निलंबित
By गणेश हुड | Published: June 7, 2024 07:07 PM2024-06-07T19:07:55+5:302024-06-07T19:08:40+5:30
अंगणवाडी साहित्य खरेदी घोटाळा : प्रथमच एकाचवेळी ११ जणांवर निलंबन कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्रेणिवर्धन योजनेच्या निधीतून जिल्ह्यातील अंगणवाड्यांना वाटप करण्यात आलेल्या साहित्य वाटपात ८४ लाखांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात ११ प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी ( सीडीपीओ) यांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी गुरुवारी जारी केले आहे. एकाचवेळी तब्बल ११ अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई होण्याची ही नागपूर जिल्हा परिषदेच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याने कर्मचारी व अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सीडीपीओ यांच्याविरोधात समिती स्तरावर आधिच पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साहित्य घोटाळ्यात जिल्ह्यातील सर्व १३ पंचायत समिती स्तरावरील प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यावर चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला आहे. परंतु चौकशी दरम्यान एक प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी सेवानिवृत्त झाल्या असून एका प्रकल्प अधिकाऱ्यांकडे दोन ठिकाणचा प्रभार असल्याने ११ अधिकाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. अंगणवाडी श्रेणिवर्धन योजनेंतर्गत अंगणवाड्यांमध्ये साहित्याचा पुरवठा करण्यासोबत डागडुजी, बांधकाम, सौर प्रकल्प, दरवाजे, खिडकी आदींसोबत पिण्याच्या पाण्याची सोय, बेबी फ्रेंडली शौचालय, सुरक्षाभिंत आदी कामे प्राधान्याने करण्याचे निर्देश महिला व बालविकास आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आले होते. या कामासाठी दोन टप्प्यांत एक कोटी सहा लाखांचा निधी जिल्हा परिषदेला मिळाला. हा सर्व निधी पंचायत समितीस्तरावरील सीडीपीओ यांच्या खात्यात वळता करण्यात आला. सीडीपीओंनी कोटेशन मागवून पुरवठादार निश्चित केले. सीडीपीओंनी शासनाने प्राधान्यक्रमाने करायची कामे व साहित्य सोडून अन्य साहित्य पुरविल्याचे सकृत दर्शनी दिसते. पुरवठादार सोयीस्कर ठरेल, अशी प्रक्रिया राबविण्यात आली आहे.