११ कोटी ४० लाख गेले परत
By admin | Published: April 3, 2015 01:52 AM2015-04-03T01:52:05+5:302015-04-03T01:52:05+5:30
चकचकीत खासगी रुग्णालयांंमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी
मेडिकल, मेयो, सुपर व दंत रुग्णालय : यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी मिळाला होता निधी
नागपूर : चकचकीत खासगी रुग्णालयांंमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी आरोग्य सेवेचे सबलीकरण करणे, त्यांची विश्वासार्हता वाढवणे, अद्ययावत उपकरण देणे, त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. सरकार आपल्यापरीने तसे प्रयत्नही करते. परंतु लालफितशाहीमुळे यावर पाणी फेरले जात आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकल, सुपर स्पेशालिटी, मेयो व दंत रुग्णालयाला उपकरणे खरेदीसाठी शासनाने निधी दिला. परंतु ३१ मार्चपर्यंत खरेदीला प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याने ११ कोटी ४० लाखांचा निधी परत गेला आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुविधा, साधने यांची भीषण कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ३ कोटी ९ लाखांचा विशेष निधी दिला. याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेतून शासकीय रुग्णालयांना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) १ कोटी ५० लाख, मेडिकलला २ कोटी, शासकीय दंत रुग्णालयाला १ कोटी ७० लाख, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला ३ कोटी २६ लाख रुपये असा ८ कोटी ४६ लाखांचा निधी मिळाला. गरीब रुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयांना मंजूर झालेल्या निधीला तत्काळ प्रशासकीय मंजुरी मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु, प्रशासकीय मान्यतेअभावी मंजूर निधी खर्च झाला नाही. वैद्यकीय संचालक कार्यालयाकडून खर्चासाठी मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला असता तर हा निधी या रु ग्णालयांना मिळाला असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मिळालेल्या निधीमधून फक्त ९४ लाखांचाच निधी खर्च झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील शासकीय संस्थेला मंजूर निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)
परत गेलेला निधी
विदर्भ वैधानिक विकास मंडळ
मेडिकल - ३ कोटी ९ लाख
जिल्हा वार्षिक योजना
मेयो - १ कोटी ५० लाख
मेडिकल - २ कोटी
दंत रुग्णालय - १ कोटी ७० लाख
सुपर स्पेशालिटी - ३ कोटी २६ लाख
इतर कामांसाठी दिला निधी
मेडिकल, मेयो, दंत रुग्णालय प्रशासनाने निधी खर्च न झाल्याने ३१ मार्चपर्यंत सायंकाळी नियोजन विभागाकडे परत केला. मात्र या विभागाने प्राप्त निधी शासनाकडे परत पाठविण्याऐवजी ज्या इतर विभागांनी निधींची मागणी केली होती, त्यांना तो उपलब्ध करून दिला.
तांत्रिक अडचणींमुळे निधी परत गेला
मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी निधी मिळाला, परंतु वाढीव मुदत मिळाली नाही. तांत्रिक अडचणींमुळे हा निधी परत गेला.
डॉ. प्रवीण शिनगारे
संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग