गांधीबागेत ८ इंचावर रोवले ११ केव्हीचे विद्युत केबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:05+5:302021-01-20T04:11:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरण कंत्राटदाराच्या दुर्बुद्धीने गांधीबागेत भयंकर अपघाताची धास्ती वाढली आहे. परिसरातील रस्त्याच्या कडेला केवळ आठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरण कंत्राटदाराच्या दुर्बुद्धीने गांधीबागेत भयंकर अपघाताची धास्ती वाढली आहे. परिसरातील रस्त्याच्या कडेला केवळ आठ इंचांचे खोदकाम करून तयार केलेल्या नालीत ११ केव्ही विद्युततारेचे रोपण करण्यात आले आहे. कंत्राटदाराच्या या अतिशहाणपणाचा धोका मात्र नागरिकांच्या जीविताला निर्माण झाला आहे. मात्र, या कामाचे निरीक्षण करण्याची तसदी महावितरणने घेतलेली नाही. ‘लोकमत’च्या चमूने या कामाचे निरीक्षण केले असता स्थिती चिंताजनक होती. केबलरोपणासाठी केलेले खोदकाम उथळ असल्याने तेथून पायपीट करणाऱ्या नागरिकांना विद्युत धक्का लागणे, वाहनांच्या वाहतुकीने आणि लोड वाढल्याने मोठा स्पार्क, आदी घटना भयावह ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गांधीबागेत डागा हॉस्पिटल रस्त्यावर लाल इमली चौक ते टांगा स्टँड चौकापर्यंत रस्त्याला लागून ११ केव्ही विद्युत केबलचे रोपण करण्यात आले आहे. या मार्गाचे नुकतेच सिमेंटीकरणही झाले आहे. त्याचमुळे रविवारी संध्याकाळी कंत्राटदाराने गांधीबागेत रस्त्याला लागून गट्टू लावण्यासाठी खोदकाम सुरू केले होते. खोदकामादरम्यान नंगा पुतळ्याजवळ अचानक मोठा स्पार्क झाला. या घटनेने प्रचंड खळबळही माजली होती. त्यानंतर बरेच तास विद्युत पुरवठा प्रभावित झाला होता. या प्रकाराने परिसरात तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी खोदकाम करणाऱ्या कंत्राटदारावर ढकलण्यात आली होती. मात्र, रस्त्याला लागून गट्टू लावण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम केवळ आठ इंचांचे आहे. एवढ्या कमी इंचांच्या खोदकामानंतर विद्युत केबल बाहेर आले, हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आता फासा महावितरणच्या कंत्राटदाराकडे वळला आहे. त्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला लागले आहे.
कामात घोटाळा झाल्याचा गंध
या सबंध प्रकरणाची तक्रार महावितरण संबंधित अधिकाऱ्यांकडे स्थानिक नगरसेविका विद्या कन्हेरे आणि सरला नायक यांनी केली. नियमानुसार सव्वा मीटर खोदकाम करणे अपेक्षित असताना केवळ आठ इंचांचे खोदकाम करून केबल रोवल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, तक्रारीनंतरही महावितरणकडून परिसर आणि कंत्राटदाराच्या कार्यप्रणालीचे निरीक्षण केले नाही. ज्या प्रकारे हे काम झाले आहे, त्यावरून या कामात मोठ्ठा घोटाळा असून, अधिकारी व कंत्राटदार यांच्यात लागेबांधे असल्याचा आरोप करीत नगरसेविकांनी या कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
फिडर बॉक्समुळेही अपघाताची भीती
विद्युत केबल रोवण्यासोबतच कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला फिडर बॉक्सही तयार केले आहेत; परंतु, ते योग्य तऱ्हेने बसविण्यात आलेले नाहीत. पन्नालाल शाळेच्या पुढे लावण्यात आलेले फिडर बॉक्स दगडावरच ठेवण्यात आले आहेत. वाऱ्यामुळे ते सतत हलत असतात. अशीच स्थिती जवळच उभारण्यात आलेल्या विद्युत खांबाचीही आहे. यामुळे अपघाताची भीती निरंतर आहे.
दोन-तीन वेळा केबल डॅमेज झाले
नंगा पुतळा परिसरात जलवाहिनी असल्याने काही ठिकाणी केबल अल्पशी वर रोवण्यात आली आहे. इतर ठिकाणी केबलचे रोपण खोलवर करण्यात आले आहे. फिडर पिलरमध्ये केबल जाते त्या जागेची गट्टू लावणाऱ्या मजुरांनी दोन-तीन वेळा मोडतोड केली आहे. गट्टू लावणाऱ्या कंत्राटदाराने जेसीबीद्वारे खोदकाम केले आहे. यावेळी कंत्राटदाराने काळजी घेणे अपेक्षित होते. केबल रोपणाचे काम पूर्ण व्हायचे आहे आणि फिडर पिलरचेही काम शिल्लक आहे. तरी सुद्धा स्थानिक नगरसेवकांसोबत स्थळाचे निरीक्षण केले जाईल.
- राहुल जीवतोडे, कार्यकारी अभियंता, गांधीबाग डिव्हिजन