राजापेठ हद्दीतील ११ लाखांच्या चोरीची उकल, नागपूरचा घरफोड्या अटकेत
By प्रदीप भाकरे | Published: April 15, 2023 05:18 PM2023-04-15T17:18:33+5:302023-04-15T17:19:47+5:30
साथीदाराचा शोध सुरू
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या ११ लाखांच्या घरफोडीप्रकरणी नागपुरातून एका जणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.
पोलीस सूत्रांनुसार, नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अक्षय नागेश पाटील (२७, रा. इंदिरानगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने निर्मलकुमार राठी (रा. महेशनगर ) यांचे बंद घर २४ फेब्रुवारी रोजी फोडले होते. राठी हे कुटुंबियांसमवेत बंगलोर येथे गेले होते. आत प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी व प्लायवूड ड्राॅव्हर तोडून त्यातील ७ लाख ३५ हजारांचे २८० ग्रॅम सोन्याचे दागिने, २ लाख २० हजारांचे २.२ किलोचे चांदीचे दागिने, रोख दीड लाख रुपये असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या गुन्ह्याचा तपास करताना आरोपी हा नागपूर शहरातील असल्याची माहिती राजापेठ पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे नागपूर गाठून पोलिसांनी अक्षय पाटील याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तीन लाखांची ५० ग्रॅम सोन्याची गड जप्त करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले. तो पोलीस कोठडीत असून त्याचा मित्र मोती हा देखील या चोरीमध्ये सहभागी असल्याचे त्याने सांगितले. पोलीस त्या फरार सहकाऱ्याचा शोध घेत आहेत.
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त विक्रम साळी, सहायक आयुक्त भारत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे, उपनिरीक्षक गजानन काठेवाडे, छोटेलाल यादव, सागर सरदार, नीलेश गुल्लाने, दिनेश भिसे, विकास गुळधे, नरेश मोहरील यांनी ही कामगिरी केली.