३८ रेती घाटांसाठी ११ रेती डेपो कार्यान्वित; नागरिकांसाठी ६०० रुपये दराने एक ब्रास रेती
By कमलेश वानखेडे | Published: February 5, 2024 07:15 PM2024-02-05T19:15:17+5:302024-02-05T19:15:52+5:30
शासनामार्फत रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहेत.
नागपूर: शासनामार्फत रेतीचे उत्खनन, साठवणूक व ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री याबाबतचे सर्वकष धोरण निश्चित करण्यात आले आहेत. या धोरणानूसार नागपूर जिल्ह्यातील पर्यावरण अनुमती प्राप्त रेती गटातून रेती उत्खनन व उत्खनन केलेल्या रेती डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती, व्यवस्थापन व विक्रीच्या अनुषंगाने नागपूर जिल्हयातील ३८ रेती घाटांसाठी ११ रेती डेपो कार्यान्वित झाले असून २ रेती घाट शासकीय कामाकरीता राखीव ठेवण्यात आले आहेत.
सर्व रेती डेपोमध्ये रेती साठवणूक करण्यासाठी रेती घाटातून उत्खनन करून डेपोमध्ये साठवणूक करण्यासाठी आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहे. या वर्षी रेती डेपोकरीता ३ लाख ३५ हजार ८८१ ब्रास एवढा रेतीसाठा उपलब्ध होणार असल्याने डेपोमध्ये पर्याप्त रेती उपलब्ध होऊन लवकरच रेती डेपो सामान्य नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार आहे. वाळू मागणीसाठी महाखनिज या प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने वाळूची मागणी नोंदविता येईल. घरकूल लाभार्थ्यांना विनामूल्य रेतीची उपलब्धता डेपोमार्फत करून देण्यात येईल व या सोबतच सामान्य नागरिकांना ६०० रूपये प्रति ब्रास या दराने ( ६०० प्रति ब्रास डीएमएफ १० टक्के (60 रूपये) एसआय शुल्क १६.५२ पैसे प्रति ब्रास म्हणजे एकूण ६७६.५२ प्रति ब्रास) रेती उपलब्ध करून देण्यात येईल.