‘त्या’ बसकडून ११ वेळा नियमांचा भंग; ७ चालान अजूनही प्रलंबित, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 08:06 AM2023-07-02T08:06:38+5:302023-07-02T09:56:03+5:30
७ चालान अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथे शनिवारी पहाटे १:३२ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झालेल्या ‘विदर्भ ट्रॅव्हल्स’ बसने ११ वेळा वाहतूक नियमांचा भंग केल्याचे पुढे आले आहे. त्यातील ७ चालान अद्यापही प्रलंबित असल्याची धक्कादायक माहिती आहे.
‘विदर्भ ट्रॅव्हल्स’च्या बसची (क्रमांक एमएच- २९, बीई- १८१९) नोंदणी २४ जानेवारी २०२० रोजी ‘आरटीओ’कडे झाली. १० मार्च २०२३ रोजी ‘आरटीओ’कडून फिटनेस सर्टिफिकेट देण्यात आले. हे सर्टिफिकेट १० मार्च २०२४ पर्यंत वैध आहे. फिटनेस तपासणीत वेग नियंत्रक यंत्रही सुस्थितीत असल्याची नोंद आहे.
‘आरटीओ’कडून वेळोवेळी झालेल्या तपासणीमध्ये अपघातग्रस्त बसला ११ चालान देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, चालानमध्ये क्षमतेपक्षा जास्त प्रवाशांना बसविण्याचे तीन ते चार चालान आहेत. याशिवाय, चालक युनिफॉर्ममध्ये नसणे, विंड स्क्रीनमध्ये दोष, टॅक्ससंबंधातीलही चालान आहेत.
अग्निक्षमन यंत्रणेची तपासणी झाली होती का?
‘आरटीओ’ने केलेल्या पाहणीत अग्निक्षमन यंत्राची तपासणी केली होती का, ते सुस्थितीत होते का, आपत्कालीन स्थितीत काच फोडण्यासाठी लागणारी हातोडी जागेवर होती का, या सर्व गोष्टी ‘आरटीओ’ने दिलेल्या ११ चालानमध्ये नसल्याची माहिती आहे. बसवर एवढे चालान असताना हे प्रकरण न्यायालयात सादर का केले नाही, असे अनेक प्रश्न आहेत. बसने १० मार्चला २०२३ रोजी फिटनेस चाचणी दिली; परंतु फिटनेस प्रमाणपत्रावर संबंधित मोटार वाहन निरीक्षकाचे नाव नाही. फिटनेस प्रमाणपत्र १० मार्च २०२४ पर्यंत वैध आहे.