धक्कादायक! ११ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, १० नराधमांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2022 01:20 PM2022-07-28T13:20:19+5:302022-07-28T13:55:36+5:30
उमरेड हत्याकांडानंतर उजेडात आली धक्कादायक माहिती
उमरेड (नागपूर) : इतवारी पेठ परिसरात शुभम ऊर्फ गोलू भोजराज दमडू (२५) याचा हकनाक बळी गेल्यानंतर पोलीस तपासात एका अकरावर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. साधारणत: एक महिन्यापूर्वी तसेच पंधरा दिवसांपूर्वी असे दोन वेगवेगळ्या दिवशी हे अत्याचार झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
शुभम दमडू खून प्रकरणाचा मुख्य आरोपी असलेल्या रोशन सदाशिव कारगावकर (२९, रा. इतवारी पेठ, उमरेड) याच्यासह गजानन दामोधर मुरूसकर (४०), प्रेमदास जागोबा गाठीबांधे (३८), राकेश शंकर महाकाळकर (२४), मयूर भास्कर दलाल (२१) सर्व रा. इतवारी पेठ, उमरेड तसेच गोविंद गुलाब नटे (२२), निखिल विनायक नरुले (२४), सौरभ उत्तम रिठे (२२), नीतेश अरुण फुकट (३०), प्रद्युम्न दिलीप करूटकर (२२) सर्व रा. रानबोडी पुर्नवसन, उमरेड अशी दहा आरोपींची नावे आहेत.
शुभम हत्याकांडाचा आरोपी असलेला रोशन कारगावकर हा मुलीच्या अत्याचार प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे. त्याने दोन वेगवेगळ्या दिवशी आरोपींना आपल्या राहत्या घरी बोलावले. त्यांच्याकडून काही रक्कम घेतली. त्या मोबदल्यात अकरा वर्षीय मुलीचा शरीरसुखासाठी वापर करून घेतला. अत्याचाराबाबत कुणाकडे सांगितल्यास तुला ठार मारू, अशी ध मकीसुद्धा तो मुलीला देत होता. तो वेळावेळी मुलीला घरी बोलायचा. तिच्यावर अत्याचार करायचा, अशाही बाबी तपासात पुढे आल्या आहेत.
काल मंगळवारी दिवसभर पोलिसांनी महिला सामाजिक कार्यकर्त्यांचीसुद्धा मदत घेतली. त्यानंतर मुलीस नागपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी रवाना करण्यात आले. आज बुधवारी सकाळच्या सुमारास वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
पोक्सो न्यायालयात हजर
मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाची कारवाई पोक्सो सहकलम ६ अन्वये करण्यात आली. यासाठी आरोपींना नागपूर येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. या ठिकाणी रोशन कारगावकर वगळता अन्य नऊ आरोपींना ३० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुभम दमडू हत्याकांडातील आरोपी असलेल्या रोशन आणि बाल्या ऊर्फ बादल मोरेश्वर लेंडे (२४, रा. आमगाव देवळी) या दोन आरोपींना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
तपासाची सूत्रे गायकवाड यांच्याकडे
मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाचा तपास नागपूर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागाच्या उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड करीत आहेत. याप्रकरणी ३७६ (डीबी), ३७६(२) (एन), ५०६ आयपीसाी, ५ (जी), (एल), (एम), पोक्सो सहकलम ६ अन्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.