विक्रीकर विभागातून हटविले ११० कंत्राटी कर्मचारी
By admin | Published: October 21, 2015 03:05 AM2015-10-21T03:05:28+5:302015-10-21T03:05:28+5:30
राज्य विक्री कर विभागाच्या नागपूर विभागातील ११० कंत्राटी कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले आहे.
नागपुरातील ४० कर्मचाऱ्यांचा समावेश : नियुक्तीमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप
नागपूर : राज्य विक्री कर विभागाच्या नागपूर विभागातील ११० कंत्राटी कर्मचाऱ्यांना हटविण्यात आले आहे. नागपूर विभागात नागपूर, अमरावती व नांदेड येथील विभागीय कार्यालयांचा समावेश आहे. हटविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नागपूर विभागीय कार्यालयातील ४० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून विभागाला १ ते ३ वर्षांची सेवा दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
विक्रीकर विभागात अस्थायी पद्धतीने काम केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी काहींनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन परत नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. कंत्राटी पद्धतीवर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या प्रकरणात पारदर्शकता बाळगण्यात आली नाही, असा त्यांचा आरोप आहे. नियमावलीच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. सातत्याने अधिकाऱ्यांसोबत भेटल्यावरदेखील अद्याप न्याय मिळाला नसल्याची माहिती जीनत फारुकी, वर्षा मधुकर बांगडे व पूजा मनोज कुमरे या कर्मचाऱ्यांनी दिली. अगोदरच आम्ही कमी वेतनावर काम केले आहे. आता वेतनाचे दर वाढल्यामुळे आम्हाला हटविण्यात आले असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला आहे.