११०० कोटींची गुंतवणूक ७५०० जणांना रोजगार
By admin | Published: December 22, 2015 04:24 AM2015-12-22T04:24:00+5:302015-12-22T04:24:00+5:30
वस्त्रोद्योग क्षेत्रातील अव्वल असलेल्या रेमंड कंपनीस अमरावतीजवळील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील २०० हेक्टर
मुख्यमंत्र्यांनी दिले सिंघानियांना देकार पत्र : रेमंडच्या प्रकल्पासाठी दिली २०० हेक्टर जमीन
नागपूर : वस्त्रोद्योग क्षेत्रातील अव्वल असलेल्या रेमंड कंपनीस अमरावतीजवळील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील २०० हेक्टर जमीन देण्यासंदर्भातील देकार पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेमंडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांना दिले.
या प्रकल्पात ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल आणि ७५०० जणांना रोजगार मिळेल. आज सकाळी विधिमंडळातील मंत्रिमंडळ सभागृहात सिंघानिया यांना जमिनीचे देकार पत्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, वस्त्रोद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ.सुनील देशमुख व आमदार रवी राणा, वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल, उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
रेमंडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सिंघानिया म्हणाले की, रेमंड समूहाने वस्त्रोद्योग क्षेत्रात मोठे नाव कमाविले आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताला मोठी संधी आहे. पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया धोरणानुसार रेमंड समूहाने महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योगांसाठीचे महाराष्ट्राचे धोरण हे देशातील सर्वात प्रभावी व चांगले धोरण आहे. तसेच उद्योग विभागाचेही मोठ्या प्रमाणावर सहकार्य मिळते. त्यामुळे रेमंड समूह राज्यात आणखी गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. रेमंड समूहाने राज्यात एकूण आठ ठिकाणी उद्योग सुरू केले आहेत. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादकांच्या कच्च्या मालाला आता हक्काची बाजारपेठ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विदर्भ, खान्देश व मराठवाड्या कापूस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे वस्त्रोद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठसह महाराष्ट्रातील नऊ ठिकाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत नव्याने वस्त्रोद्योग उद्यान (टेक्सटाईल पार्क) उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसाला स्पर्धात्मक भाव व बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. वस्त्रोद्योग क्षेत्राची रोजगार निर्मिती क्षमता विचारात घेऊन या उद्योगास प्रोत्साहन देण्याचा तसेच तयार कापडावर मूल्यवर्धित प्रक्रिया करून गारमेंट पार्कच्या माध्यमातून महिलांनादेखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा मानस आहे.(विशेष प्रतिनिधी)
नांदगावात आणखी तीन वस्त्रोद्योग
४रेमंड उद्योग समूहाचे महाराष्ट्रात यवतमाळ, जळगाव, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी वस्त्रोद्योग युनिट आहेत. सद्यस्थितीत अतिरिक्त अमरावती (नांदगाव पेठ) औद्योगिक क्षेत्रात शाम इंडोफॅब लि., व्ही.एच.एम. इंडस्ट्रिज लि., सूर्यालक्ष्मी कॉटन मिल आणि सियाराम सिल्क मिल या उद्योगांना एकूण १०२ हेक्टर जमीन वाटप करण्यात आली आहे. यातून २२०० कोटी गुंतवणूक व साधारणत: ५२०० रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.