एका दिवसात पहिल्यांदाच ११ हजार टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:56+5:302021-02-24T04:08:56+5:30
नागपूर : कोरोना आणीबाणीच्या काळातही दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारावर गेली नव्हती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवारी तब्बल ११ ...
नागपूर : कोरोना आणीबाणीच्या काळातही दैनंदिन चाचण्यांची संख्या १० हजारावर गेली नव्हती, परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मंगळवारी तब्बल ११ हजार कोरोना संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यातून ६९१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या १४४५३४ झाली. ८ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४२९१ वर पोहोचली. दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ६.२८ टक्के आहे.
नागपूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात बाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला होता. सोबतच याच महिन्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येने पहिल्यांदाच ९ हजाराचा टप्पा ओलांडला होता. तब्बल पाच महिन्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी ९७५२ सर्वाधिक चाचण्या झाल्या. त्यानंतर आज, १०९९६ चाचण्यांची विक्रमी नोंद झाली. विशेष म्हणजे, चार दिवसात चाचण्यांची संख्या ९ हजारांवर गेली. आज सर्वाधिक, ४२७५ चाचण्या खासगी लॅबमध्ये झाल्या. त्यानंतर मेयोच्या प्रयोगशाळेत १०५६, मेडिकलच्या प्रयोगशाळेत १०२१, एम्सच्या प्रयोगशाळेत ५८३, नागपूर विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत ३२५, नीरी प्रयोगशाळेत २५१ चाचण्या झाल्या. एकूणच चाचण्यांमध्ये ७५११आरटीपीसीआर, तर ३४८५ रॅपिड अँटिजेनचा समावेश होता. आरटीपीसीआरमध्ये ५५७, तर अँटिजेनमधून ३४ रुग्ण पॉझिटिव्ह आले.
- शहरात ५५१, ग्रामीणमध्ये १३८ रुग्ण
नागपूर जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये शहरातील ५५१, ग्रामीणमधील १३८, तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्ण आहेत. मृतांमध्ये शहरातील ५, ग्रामीणमधील १, तर जिल्ह्याबाहेरील २ मृत्यू आहेत. आज ४७७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या १३३७७५ झाली आहे. बरे होण्याचा दर कमी होऊन ९२.५६ टक्क्यांवर आला आहे.
- मेडिकलमध्ये १२७, मेयोमध्ये ९०, एम्समध्ये ५१ रुग्ण
सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ६४६८ झाली आहे. यातील १८२८ रुग्ण रुग्णालयात भरती आहेत. यात मेडिकलमध्ये १२७, मेयोमध्ये ९०, तर एम्समध्ये ५१ रुग्ण आहेत. विविध खासगी कोविड रुग्णालयांसह व कोविड केअर सेंटर मिळून १५६० रुग्ण भरती आहेत. ४६४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहे. या सर्व रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करण्याच्या कार्याला प्रशासनाने वेग आणला आहे. यामुळे पुढील काही दिवसांत रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- दैनिक चाचण्या : १०९९६
- बाधित रुग्ण : १४४५३४
_- बरे झालेले : १३३७७५
- उपचार घेत असलेले रुग्ण : ६४६८
- मृत्यू : ४२९१