उद्या नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ; एक लाखांवर विद्यार्थ्यांना पदवीदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 08:46 PM2023-04-11T20:46:44+5:302023-04-11T20:47:18+5:30

Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ गुरुवार, १३ एप्रिल राेजी आयाेजित करण्यात आला आहे.

110th convocation of Nagpur University tomorrow; Graduation to one lakh students | उद्या नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ; एक लाखांवर विद्यार्थ्यांना पदवीदान

उद्या नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ; एक लाखांवर विद्यार्थ्यांना पदवीदान

googlenewsNext

नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ गुरुवार, १३ एप्रिल राेजी आयाेजित करण्यात आला आहे. या साेहळ्यात हिवाळी २०२१ व उन्हाळी २०२२ च्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १ लाख १७२२ विद्यार्थ्यांना पदवीदान तर ३३० विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येतील. यासह २८० संशाेधकांना आचार्य तर एका विद्यार्थिनीला डिलीट पदवीने सन्मानित करण्यात येईल. एकूण परीक्षांमधून १०८ प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्ण व राैप्य पदकांसह पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

वसंतराव देशपांडे सभागृह येथे गुरुवारी दुपारी २ वाजता हाेणाऱ्या विद्यापीठाच्या दीक्षांत समाराेहात महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्लीचे अध्यक्ष डाॅ. टी.जी. सीताराम व नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी उपस्थित राहणार आहेत. कुलगुरुंनी मंगळवारी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. पदवीप्राप्त विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ३२,७०९, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे २७,९२५, मानव विज्ञान विद्याशाखेचे २५,६५९, आंतरविद्याशाखीय अभ्यासाचे ८०७७ आणि स्वायत्त महाविद्यालयांच्या ७३५१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

आचार्य पदवीधारकांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे ९७, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे ३८, मानव विज्ञान विद्याशाखेचे ११३ व आंतर विद्याशाखीय अभ्यासक्रमातील ३२ संशाेधकांचा समावेश आहे. गेल्या दाेन वर्षाच्या तुलनेत यावेळी संशाेधकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे. ६८ संशाेधन प्रलंबित असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पत्रपरिषदेला प्र-कुलगुरू डाॅ. संजय दुधे, कुलसचिव डाॅ. राजू हिवसे व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे डाॅ. प्रफुल्ल साबळे उपस्थित हाेते.

नंदिनी साेहाेनी, विकी पडाेळे यांना ७ सुवर्ण

विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये गुणवत्ता प्राप्त केलेल्या १०८ विद्यार्थ्यांना दीक्षांत समाराेहात १५७ सुवर्ण पदके, ९ राैप्य पदके आणि २९ राेख पारितोषिक प्रदान करण्यात येतील. यामध्ये बीए. एलएलबी. विद्याशाखेची नंदिनी साेहाेनी यांनी ७ सुवर्ण पदके व २ पारितोषिक प्राप्त केले तर एमबीएचा विकी पडाेळे या विद्यार्थ्याने ७ सुवर्ण पदके प्राप्त केले. यासह एलएलबीची अनुप्रिया प्रसादला ५ सुवर्ण पदके, एमएससी रसायनशास्त्र विषयात कमलदास गिर्हेपुंजे यांनी ४ सुवर्ण व १ राैप्य, एमए मराठीच्या साेमराज गिरडकर याला ४ सुवर्ण व १ पारितोषिक आणि डाॅ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या राजश्री ढबाले यांना ४ सुवर्ण व १ पारितोषिक प्रदान करण्यात येईल.

४ संशाेधकांना मरणाेपरांत आचार्य

संशाेधन पूर्ण केल्यानंतर वेगवेगळ्या कारणाने मृत्यूस प्राप्त झालेल्या ४ संशाेधकांना यावेळी मरणाेपरांत आचार्य पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये काेराेनामुळे प्राण गमावलेल्या दिनेशकुमार देवदास यांना संगीत विषयात तर सचिन बडवाईक यांना लायब्ररी विज्ञान शाखेतील संशाेधनासाठी आचार्य पदवी प्रदान करण्यात येईल. यासह सजिवशास्त्र विषयात अर्चना भाेगाडे यांना व पूनम राेहित बाेथरा यांना अर्थशास्त्र विषयात मरणाेपरांत आचार्य पदवीने सन्मानित करण्यात येईल. त्यांच्या कुटुंबियांकडून त्यांचा सन्मान स्वीकारला जाईल.

Web Title: 110th convocation of Nagpur University tomorrow; Graduation to one lakh students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.