१११ किलो प्लास्टिक जप्त, उपद्रव शोध पथकाची कारवाई
By मंगेश व्यवहारे | Published: October 18, 2023 08:11 PM2023-10-18T20:11:36+5:302023-10-18T20:11:49+5:30
महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १११ किलो प्लास्टिक जप्त करून ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी) पथकाने ही संयुक्त कारवाई केली.
धंतोली झोनच्या पथकाने कॉटन मार्केट स्थित हरे कृष्णा ट्रेडर्स यांच्याकडून १० हजार रुपये तर बंडू पत्रावळी यांच्याकडून ५ हजार रुपये दंड वसूल केला. गांधीबाग झोनच्या पथकाने गुरू गोविंद सिंग प्लास्टिक यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक बाळगल्याप्रकरणी कारवाई करीत ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
धरमपेठ झोनच्या पथकाद्वारे गोकुळपेठ मार्केट येथील अग्रवाल डिस्पोजल्स आणि प्रकाश किराणा भंडार यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला. सतरंजीपुरा पथकाद्वारे गोळीबार चौक स्थित अंकित प्लास्टिक आणि डॉ. आंबेडकर चौक सीए रोड येथील चेतन गिरे यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी ५ हजार रुपये दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.