कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्याचे ११,१०० पॅकेट जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:07 AM2021-05-28T04:07:31+5:302021-05-28T04:07:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क केळवद : पाेलिसांनी सावनेर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील बिहाडा फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये केंद्र शासनाने बंदी घातलेल्या कपाशीच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
केळवद : पाेलिसांनी सावनेर-पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावरील बिहाडा फाटा परिसरात केलेल्या कारवाईमध्ये केंद्र शासनाने बंदी घातलेल्या कपाशीच्या एचटीबीटी बियाण्यांचे ११,१०० पॅकेट पकडली. या कारवाईमध्ये बियाण्याचे पॅकेट व ट्रक असा एकूण १ काेटी ५ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार दिलीप ठाकूर यांनी दिली. ही कारवाई बुधवारी (दि. २६) रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
सुरेंद्र पर्वतसिंह धाकड (२५, रा. वडधामना, नागपूर) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. ताे महावीर पायल आरजीटी ट्रान्सपोर्ट, पंचवटी, इंदोर, मध्य प्रदेश येथे ट्रकचालक म्हणून नाेकरी करताे. मध्य प्रदेशातून नागपूरच्या दिशेने प्रतिबंधित कपाशीच्या बियाण्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच पाेलिसांच्या पथकाने या मार्गावरील बिहाडा फाटा येथे नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली.
यात त्यांनी नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एमएच-४०/एन-९४९५ क्रमांकाचा ट्रक थांबवून झडती घेतली. त्या ट्रकमध्ये त्यांना कपाशीच्या प्रतिबंधित बियाण्यांचे ११,१०० पॅकेट आढळून आले. त्यामुळे त्यांनी कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नाेंदवित ट्रकचालकास अटक केली. शिवाय, त्याच्याकडून बियाणे व ट्रक असा एकूण १ काेटी ५ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये मेघना, विडगार्ड, आर काॅ-१८, कल्पवृक्ष, विजया, काव्या, राघवा-९, केसीएचएच-१११ केसीएचएच-५५५ आदी वाणाचे बियाणे असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अश्विनी काेरे यांनी दिली.
...
बियाणे कंपन्यांवर कारवाई करणार का?
संबंधित व्यक्तीने प्रतिबंधित कपाशीचे बियाणे मध्य प्रदेशातील इंदाेर भागातून आणल्याची माहिती पाेलिसांनी दिली असून, याला कृषी अधिकाऱ्यांनी दुजाेरा दिला आहे. प्रतिबंधित बियाणे प्रकरणात कृषी व पाेलीस विभाग बियाणे वापरणारे शेतकरी, त्याचे वाहतूकदार व विक्रेत्यांवरच गुन्हा दाखल करून कारवाई करते. मात्र, बियाणे उत्पादक कंपन्यांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून, दाेन्ही विभाग व राज्य शासन बियाणे उत्पादक कंपनीवर कारवाई करणार काय, असा प्रश्नही शेतकरी नेते मदन कामडे यांनी उपस्थित केला आहे.
...
शेतकऱ्यावर गुन्हा दाखल
एचटीबीटी कपाशीवर तणनाशकाची फवारणी करता येत असल्याने निंदणीचा खर्च वाचताे. या कपाशीचे उत्पादनही बऱ्यापैकी येत असल्याने शेतकरी या बियाण्याला प्राधान्य देतात. केळवद परिसरातील एका शेतकऱ्याने या प्रतिबंधित कपाशीच्या बियाण्याचे केवळ एक पॅकेट पेरणीसाठी खरेदी केले. पाेलिसांनी कृषी विभागाच्या तक्रारीवरून त्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. देशभर या प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची खुलेआम विक्री व पेरणी केली जात असताना महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करते. ही बाब अन्यायकारक असल्याने हे बियाणे वापरणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.